कोरोनाचा वाढता प्रसार आपण निश्चित थांबवू. -मुख्यमंत्री
उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसताहेत
कोरोनाचा वाढता प्रसार आपण निश्चित थांबवू
मुख्यमंत्र्यांचा मुंबई पालिका रुग्णालय डॉक्टर्सशी संवाद
मुंबई प्रतिनिधी : मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांवर गेला आहे तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढते आहे. गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ आपण सर्व अविरत ही लढाई लढत आहात आणि त्यामुळेच आपण निश्चितपणे कोरोनाचा प्रसार पूर्णपणे थांबवू शकतो असा मला विश्वास आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील रुग्णालये, वैद्यकीय अधिकारी, डीन , डॉक्टर्स यांच्याशी आज दुपारी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे चर्चा केली. यावेळी प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव डॉ. संजय मुखर्जी, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने देखील सहभागी होते.
फिल्ड हॉस्पिटल
मुख्यमंत्री म्हणाले की, एकीकडे आपण या वैद्यकीय आणीबाणीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेले सर्व निदेश व प्रोटोकॉल काटेकोर पाळत आहोत तसेच प्लाझ्मा थेरपी, प्लस ऑक्सिमीटरचा उपयोग या माध्यमातून उपचारामध्ये सहाय्यभूत ठरेल अशी पाऊले उचलत आहोत. पुढील काळासाठी आपण फिल्ड हॉस्पिटल उभारणीवर भर दिला पाहिजे तसेच सुसज्ज कंट्रोल रूमच्या माध्यमातून कोरोना विषयक वैद्यकीय सेवा व सुविधाचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईत विविध ठिकाणी आयसीयू व आयसोलेशन बेड्सची सुविधा आपण निर्माण केली आहे. या सुविधांचा उपयोग करण्याची वेळ येऊ देखील नये परंतु आपले नियोजन चांगले आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, येणाऱ्या पावसाळ्यात लेप्टो, डेंग्यू सारख्या आजारांमुळे रुग्ण वाढतील. त्यावरही तातडीने उपचार करावे लागतील यादृष्टीने पालिकेने तयारी ठेवावी. मला तुमच्याकडे पाहून हुरूप येतोय असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, ही साथ ओसरल्यावर तुम्ही या विजयाचे खरे शिल्पकार असणार आहात यात काही शंकाच नाही.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी राहा, सुरक्षित राहा
प्रशासनाला सहकार्य करा...