अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द आपत्ती व्यवस्थापचा निर्णय.

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द आपत्ती व्यवस्थापचा निर्णय.



अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा


राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये निर्णय- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत


ज्यांना परीक्षा द्यायची असेल त्यांनी विद्यापीठाकडे तसे लेखी स्वरुपात द्यावे,


परीक्षेबाबत कोवीड-19 चा प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन निर्णय


मुंबई प्रतिनिधी : विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षाच्या/अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पण ज्यांना  परीक्षा द्यायच्या आहेत, त्यांनी विद्यापीठाकडे लेखी स्वरूपात द्यावे, त्या परीक्षा घेण्याबाबत कोविड-19 प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या फेसबूक पेज लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जाहीर केले. त्यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.


         सामंत यांनी सांगितले, काल राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची  बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कोविड -19  विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अंतिम वर्षाच्या /अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून विद्यार्थी आणि पालकांच्या मनात विद्यापीठाच्या परीक्षेबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. ती संभ्रमावस्था दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


         अंतीम वर्षाच्या परीक्षा द्यायच्या आहेत किंवा परीक्षा द्यायच्या नाहीत याबाबत विद्यार्थ्यांनी लेखी स्वरूपात विद्यापीठाकडे आपले मत  कळवावे. परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे परीक्षा द्यायची नाही त्यांना योग्य त्या सुत्रानुसार पदवी प्राप्त होईल आणि ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्याबाबत कोविड-१९चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन परीक्षेबाबत नंतर निर्णय घेण्यात येईल, असेही  सामंत यांनी सांगितले. 


            अव्यवसायिक (पारंपरिक) अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थी जे सर्व सत्रांत उत्तीर्ण झालेले आहेत अशा अंतिम सत्रात असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची नसेल तर अशा विद्यार्थ्यांकडून लेखी घेवून विद्यापीठाने त्यांना अंतिम परीक्षा पास करून पदवी प्रमाणपत्र द्यावयाचे आहे. तसेच ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांनी देखील लेखी दिल्यानंतर विद्यापीठाकडून कोविड-१९नंतर योग्य परिस्थिती निर्माण झाल्यास परीक्षाचे नियोजन करायचे आहे. 


         अभियांत्रिकी, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, व्यवस्थापनशास्त्र, वास्तुकला, प्लॅनिंग, संगणकशास्त्र, विधी, शारीरिक शिक्षण, अध्यापनशास्त्र असे व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबतही अशाच प्रकारचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी संबंधित अभ्यासक्रमासाठीच्या शिखर संस्थेची परवानगी घेण्यात येणार आहे. तसेच येत्या चार दिवसात बॅकलॉक आणि एटीकेटी परीक्षेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कुलगुरुंशी चर्चा करून निर्णय घेण्यात घेण्यात येईल, असे सांगून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीरपणे विचार करून शासनाने हा निर्णय घेतला आहे, असेही  सामंत यांनी संगितले.


           दिगंबर वाघ
        कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८


 


           घरी राहा, सुरक्षित राहा 
           प्रशासनाला सहकार्य करा...