मुलांच्या संघाने आंध्र प्रदेशचा तर मुलींच्या संघाकडून झारखंडचा धुव्वा

खेलो इंडियात महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या कबड्डी संघांची विजयी सलामी -सुनील केदार क्रीडा मंत्री

मुंबई प्रतिनिधी : चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेत पहिल्या दिवशी झालेल्या महाराष्ट्राच्या मुलांच्या कबड्डी संघाने आंध्र प्रदेशचा तब्बल १९ गुणांनी तर मुलींच्या संघांने झारखंडचा ४५ गुणांनी धुव्वा उडवला. हरियाणाच्या भूमीत विजयी सलामी देत आपले कौशल्य दाखवल्याबद्दल राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी कबड्डीच्या मुला-मुलींच्या संघांतील खेळाडूंचे  अभिनंदन केले.

    महाराष्ट्राने मुलांच्या संघाने तब्बल ४८ गुण घेतले तर आंध्र प्रदेशला २९ गुणांपर्यंतच मजल मारता आली.ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉप्लेक्समध्ये हा सामना झाला. सुरूवातीला अटीतटीचा वाटणारा सामना महाराष्ट्राने एकतर्फी केला. महाराष्ट्राने पहिल्याच चढाईत एक गुण घेतला. डु ऑर डाय रेडमध्येही गुण मिळवला. सुरूवातीपासूनच महाराष्ट्राने आक्रमक खेळ केला. परंतु  नंतर आध्र प्रदेशने आक्रमकता वाढवून सामन्यात पुनरागमन केले. चार विरूद्ध पाच गुणांची आघाडी घेतली. त्यांनी चारगुणांची कमाई करीत महाराष्ट्राला ऑल आऊट केले. त्यामुळे सामना बारा विरूद्ध सहा असा फिरला. परंतु नंतर महाराष्ट्राचे खेळाडू आक्रमक झाले. आंध्र प्रदेशला ऑलआऊट केले. त्यामुळे त्यांचे पंधराविरूद्ध सोळा गुण झाले. अठराव्या मिनिटाला सतरा आणि सतरा अशी बरोबरी झाली. परंतु पहिल्या हाफमध्ये महाराष्ट्रने तीन गुणांची आघाडी घेतली. त्यावेळी गुणफलकावर २० विरूद्ध १७ असे गुण होते. दुसऱ्या हाफ मध्ये महाराष्ट्र आणखीच आक्रमक झाला. त्यांनी चढाई आणि बचावातही उजवा खेळ केला. त्यामुळे आठ मिनिटे बाकी असताना जवळपास दुप्पट गुण मिळवले. शेवटी महाराष्ट्राने ४८ गुण मिळवत पहिलावहिला खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये विजय नोंदवला.

    शिवम पठारे (अहमदनगर), पृथ्वीराज चव्हाण (कोल्हापूर) यांनी चढाईत नेत्रदीपक कामगिरी केली. त्यांच्या बळावरच महाराष्ट्राला गुण मिळवता आले. दादासाहेब पुजारी, रोहन तुपारे, साईप्रसाद पाटील, जयेश महाजन यांनी उत्कृष्ट पकडी केल्या. त्यामुळे संघाला भरभक्कम आघाडी घेता आली.

कबड्डीत झारखंडचा ४५ गुणांनी उडवला धुव्वा

    पहिल्याच दिवशी कबड्डीत मुलांनंतर मुलींनी विजयी पतका फडकावत महाराष्ट्राचे नाव उंचावले. मुलींनी नेत्रदीपक कामगिरी करीत तब्बल ४५ गुणांनी झारखंडचा धुव्वा उडवला. ६० विरूद्ध १५ असा हा सामना झाला. पंचकुलातील ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये हा सामना रंगला. सामन्यात पहिल्या पाचच मिनिटांत मुलींनी झारखंडवर पाच-शून्य अशी गुणांची आघाडी घेतल्याने झारखंडला सामन्यात कमबॅक करता आले नाही.

    खेळाडूंनी प्रारंभीच सामना महाराष्ट्राच्या बाजूने झुकवला होता. पहिल्या हापमध्ये १५ गुणांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या हापची दहा मिनिटे उरली असताना महाराष्ट्राच्या मुलींनी तब्बल ४५ गुण फलकावर लावले. त्यावेळी झारखंडचे अवघे १३ गुण होते. त्यामुळे केवळ सामन्याची औपचारिकता उरली होती. सामन्याला एक मिनिट उरला असताना पुन्हा एकदा झारखंडला ऑल आऊट केले. त्यामुळे गुणफलकावर लागले ६० गुण. झारखंडचे होते अवघे १५ गुण.प्रशिक्षक गीता साखरे-कांबळे, सोनाली जाधव यांनी तर टीम व्यवस्थापक अनिल सातव, महेश खर्डेकर, ज्ञानेश्वर खुरांगे, सपोर्ट स्टाफ विजय खोकले, किशोर बोंडे यांनी खेळाडूंचा उत्साह वाढवला. या सर्वांनी ठरवलेल्या प्लॅननुसार खेळाडूंनी सामन्यात कौशल्य दाखवले.

या मुली चमकल्या

    चढाईत हरजीतसिंग संधू  ११ गुण (मुंबई), ऋतुजा अवघडीने ८ गुण मिळवले. पकडीतही ती चमकली. यशिका पुजारीने पाच गुण मिळवले. निकिता लंगोटे आणि कोमल ससाणे यांनी नेत्रदीपक पकडी केल्या. मुस्काने लोखंडे हिनेही उत्कृष्ट बचाव केला. एकंदरीत सांघिक कामगिरीमुळे महाराष्ट्राला एकतर्फी विजय मिळवता आला.

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८


 निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा,मास्क वापरा, लसीकरण करुन घ्या..