मॉलिक्युलर आणि आरटीपीसीआर कोविड प्रयोगशाळेचे लोकार्पण

मॉलिक्युलर आणि आरटीपीसीआर कोविड प्रयोगशाळेचे लोकार्पण


सिंधुदुर्गासाठी वैद्यकीय महाविद्यालय व अत्याधुनिक रुग्णालय देणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबई प्रतिनिधी : रेण्वीय निदान (मॉलिक्युलर) प्रयोगशाळा आणि आरसीपीटीआर कोविड तपासणी सुविधेमुळे सिंधुदुर्गाच्या आरोग्य सुविधेत वाढ झाली आहे. कोरोनाच्या चाचणीबरोबरच माकडताप व इतर रोगांच्या चाचण्या जिल्ह्यात होणार आहेत. त्यामुळे याचा जिल्हावासियांना निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अत्याधुनिक रुग्णालयाची मागणी देखील आपण  पूर्ण करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली.


            सिधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात एकुण ३ कोटी २१ लाख ८३ हजार रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अद्ययावत रेण्वीय निदान प्रयोगशाळा व आरटीपीसीआर प्रयोगशाळेचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन  उद्घाटन केले, त्यावेळी ते बोलत होते.  मुख्यमंत्री  ठाकरे पुढे म्हणाले, निसर्गरम्य कोकणावर माझे नेहमी प्रेम राहिले आहे. कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी शासन खंबीरपणे उभे राहील. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने अत्यंत कमी कालावधीत या प्रयोगशाळा उभ्या केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन. तसेच या प्रयोगशाळेतून यापुढे कोरोनाच्या पॉझिटीव्ह चाचण्या येऊ नयेत यासाठी प्रार्थना करतो, असेही ते म्हणाले.  कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आज प्रत्यक्ष नाही तर ऑनलाईन पद्धतीने या कोविड तपासणी लॅबचे लोकार्पण करत आहे. सिंधुदुर्गात लॅब उभी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिंधी यांची तळमळ फार महत्वाची होती.  ही लॅब उभी करण्यासाठी तत्काळ निर्णय घेण्यात आला त्या दृष्टीने शासन निर्णयही काढण्यात आला, असल्याचेही त्यांनी नमूद केले.


            महाराष्ट्र हा जीव की प्राण आहे. तर कोकण हा आमच्यासाठी पाठीचा कणा आहे त्यामुळेच कोकण नेहमी शासनाच्या पाठी राहिला आहे. आज या लॅबचे लोकार्पण झाले याचे मला खूप समाधान आहे. तळकोकणामध्ये एखादा रोग उद्भवल्यास उपचारासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यात अथवा गोवा  किंवा अधिक  गंभीर स्थिती असेल तर मुंबईत जावे लागते अशी परिस्थिती आजपर्यंत होती आता ही परिस्थिती बदलत असल्याचेही ठाकरे म्हणाले.


           मुंबईमध्ये २००७ साली कस्तुरबा रुग्णालयात पहिली मॉलिक्युलर लॅब सुरू झाली. त्यानंतर पुणे येथे दुसरी लॅब झाली.  त्याकाळी दोनच लॅब राज्यात कार्यान्वित होत्या. आज एका गोष्टीचे समाधान वाटते की राज्यात जवळपास शंभर लॅब सुरू झाल्या आहे. यापुढे हाच प्रयत्न असणार आहे की अशा लॅब प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शहरात प्रत्येक तालुक्यात असली पाहिजे. याचे कारण जर का कोरोनासोबत जगायचे असेल तर कोरोनाचे निदान लवकरात लवकर आणि त्यावर औषधोपचार सुरू होणे गरजेचे आहे.   त्यामुळेच आरोग्य विषयक सुविधा  राज्यभर पोहोचवायच्या आहेत. आरोग्य विषयक आलेले संकट हे मोठे असते,  महाराष्ट्रात  कोठेही आरोग्य सुविधा कमी पडणार नाही याची खबरदारी घेतली जात असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.


        आरोग्य यंत्रणा भक्कम : पालकमंत्री उदय सामंत


          सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी राज्य शासनाकडून रेण्वीय (मॉलिक्युलर)  निदान प्रयोगशाळा व आरटीपीसीआर कोविड टेस्टिंग सुविधा तातडीने मंजूर करुन दिल्यामुळे सिंधुदुर्गाच्या आरोग्य यंत्रणेत खुप मोठी भर पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव येत्या महिन्याभरात  तातडीने शासनास सादर करण्यात येईल. 


        साथीचे निदान स्थानिक स्तरावर: आरोग्यमंत्री राजेश टोपे


              सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना निदानाबरोबरच माकडताप व अन्य साथीच्या रोगाचे निदान आता स्थानिक स्तरावरच होणार आहे. ही आरोग्य विभागाच्या दृष्टीने अत्यंत भुषणावह बाब आहे. ही लॅब उभी करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून निधी देण्यात आला आहे.  प्रारंभी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या रेण्वीय (मॉलिक्युलर) निदान प्रयोगशाळा व आरटीपीसीआर कोविड लॅब उभारणी बाबत माहिती दिली. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग यांच्या वतीने करण्यात आलेल्या विशेष माहितीपटाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.  या प्रसंगी खासदार विनायक राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार वैभव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, निवासी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, संजय पडते, संदेश पारकर,  विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते


      दिगंबर वाघ


               कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


                घरी राहा, सुरक्षित राहा 
                प्रशासनाला सहकार्य करा...