गुन्हे उघडकीस आणणे व प्रतिबंध करणे
समाजाचे रक्षण,सहाय्य आणि दिलासा देणे
आपल्या देशातील/राज्यातील विविध कायद्यांची अंमलबजावणी करणे ही महाराष्ट्र पोलीस सेवेची मूलभूत कर्तव्ये आणि उद्दीष्टे आहेत.
नागरीकांचे हक्क
जामीनपात्र आणि अजामीनपात्र अपराध-फौजदारी प्रक्रिया संहितेखाली अपराधाचे जामीनपात्र आणि अजामीनपात्र असे वर्गीकरण करण्यात आले आहे.
जामीनपात्र अपराध :
या वर्गवारीत येणा-या अपराधासाठी आरोपीने जामीनासाठी अर्ज केला असल्यास त्यास जामीन देणे हे तपास अधिका-यावर बंधनकारक आहे.
अटकेनंतर आरोपीने योग्य जामीन दिला आणि इतर शर्तीची पूर्तता केली तर त्यास जामीनावर सोडणे तपास अधिका-यावर बंधनकारक आहे.
अजामीनपात्र अपराध :
या वर्गवारीत येणा-या अपराधामध्ये पोलीस जामीन देऊ शकत नाहीत. हा निर्णय न्यायदंडाधिकारी/न्यायाधीश यांनीच घ्यावयाचा असतो.
तपास अधिकारी यांनी आरोपी अटकेनंतर त्यास २४ तासाच्या आत न्यायदंडाधिकारी /न्यायाधीश यांच्या समोर हजर केलेच पाहीजे. त्यावेळी स्वत: अथवा त्याचा प्रतिनिधी/वकील यांच्यामार्फत जामीनासाठी अर्ज करण्याचा आरोपीस अधिकार आहे.
अटकेनंतर पोलीसांनी आरोपीस कोणतीही गैरवागणूक दिली असल्यास याबाबत न्यायदंडाधिकारी/न्यायाधीश यांच्याकडे तक्रार करण्याची त्यास संधी आहे.
अटक केलेल्या व्यक्तीचे हक्क :
अटक करणा-या आणि अटक व्यक्तीकडे चौकशी करणा-या पोलीस अधिका-या जवळ अचूक, सहज दिसणारे, स्पष्ट ओळख आणि पदनामासह नेम प्लेट असणे आवश्यक आहे.
अटक करणा-या पोलीस अधिका-याने अटकेच्या वेळी अटकेचे टिपण (मेमो) तयार करणे आवश्यक आहे आणि असे टिपण किमान एक साक्षीदाराने साक्षांकित करणे आवश्यक आहे, जो अटक झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य किंवा अटक झालेल्या परिसरातील प्रतिष्ठीत व्यक्ती असू शकतो. अशा टिपणावर अटक झालेल्या व्यक्तीने प्रतीस्वाक्षरी करणे आवश्यक आहे आणि त्यामध्ये अटकेची तारीख आणि वेळ यांचा समावेश असला पाहिजे.
ज्या व्यक्तीला अटक करण्यात आली किंवा अटकावण्यात आले आणि पोलीस ठाण्यात किंवा चौकशी केंद्रात किवा इतर कोठडीत ठेवण्यात आले आहे, अशा व्यक्तीला आपल्याला अटक झाली असून विशिष्ट ठिकाणी स्थानबद्ध करण्यात आले आहे हे त्याच्या एका मित्राला किंवा नातेवाईकाला किंवा त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला किंवा त्याच्या हितसंबंधी असलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीला व्यवहारीक दृष्टीने शक्य तेवढया लवकर कळविण्याचा हक्क आहे, जर अटक झालेल्या व्यक्तीच्या अटक टिपणावर त्याची स्वतः ची किंवा त्याच्या अशा मित्राची किंवा नातेवाईकाची स्वाक्षरी असेल तर असे कळवण्याची आवश्यकता नाही.
अटक झालेल्या व्यक्तीच्या अटकेची वेळ, स्थान आणि कोठडीचे ठिकाण यासंबंधी पोलीसांनी अधिसुचित करणे आवश्यक आहे, जर अटक झालेल्या व्यक्तीचा जवळचा मित्र किंवा नातेवाईक बाहेरच्या जिल्हयात किंवा शहरात वास्तव्यास असेल तर पोलीसांनी अटक झाल्यानंतर ८ ते १२ तासाच्या कालावधीत तात्काळ संपर्क सेवेव्दारे अशा अटकेसंबंधी; संबंधीत जिल्हयातील कायदेशीर मदत केंद्र आणि संबंधीत क्षेत्रातील पोलीस ठाण्यामार्फत कळवणे आवश्यक आहे.
अटक झाल्यानंतर किंवा स्थानबद्ध केल्यानंतर लगेच त्याच्या अटकेबाबत किंवा स्थानबद्धतेसंबंधी कोणालातरी कळवण्याचा त्याला हक्क आहे, याची अटक झालेल्या व्यक्तीला माहिती देणे आवश्यक आहे.
कोणत्याही व्यक्तीच्या अटकेसंबंधी स्थानबद्धतेच्या ठिकाणी डायरीत नोंद करणे आवश्यक आहे. अशा नोंदीत व्यक्तीला अटक केल्यानंतर किंवा स्थानबद्ध केल्यानंतर लगेच अशा व्यक्तीच्या अटकेसंबंधी कळवण्यात आलेल्या जवळच्या मित्राच्या/नातेवाईकाच्या नावाचा समावेश असला पाहिजे.
अटक झालेल्या व्यक्तीने जर विनंती केली तर त्याच्या अटकेच्या वेळी त्याची तपासणी करून त्याच्या शरीरावरील लहान, मोठ्या जखमांची त्यावेळी नोंद केली पाहिजे. तपासणी झाल्यावर अटक झालेली व्यक्ती आणि अटक करणारा पोलीस अधिकारी अशा दोघांनी स्वाक्ष-या केल्या पाहिजेत.
आणि सदर टिपणाची (मेमो) प्रत अटक झालेल्या व्यक्तीला देणे आवश्यक आहे.
कोठडीतील स्थानबद्धतेच्या काळात प्रत्येक ४८ तासानंतर डॉक्टरांच्या मंजूर पॅनलवरील तज्ञ डॉक्टरांनी अटक झालेल्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या पॅनलवर संबंधित राज्याच्या किंवा केंद्रशासीत प्रदेशाच्या संचालक, आरोग्य सेवा यांनी डॉक्टरांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. संचालक, आरोग्य सेवा यांनी सर्व तहसील आणि जिल्हयांसाठी देखील अशा प्रकारचे पॅनल तयार करणे आवश्यक आहे.
वर उल्लेख केलेल्या अटक टिपणासहीत सर्व दस्तऐवजांच्या प्रती दंडाधिका-यांकडे त्याच्या अभिलेखासाठी पाठविणे आवश्यक आहे.
चौकशी दरम्यान अटक झालेल्या व्यक्तीला आपल्या वकीलाला भेटण्याची परवानगी दिली जाऊ शकते परंतू संपूर्ण चौकशी दरम्यान तशी परवानगी दिली जाणार नाही.
अटक केल्यानंतर १२ तासांच्या आत सर्व जिल्हयातील आणि राज्य मुख्यालयातील पोलीस नियंत्रण कक्षाला अटक केलेल्या अधिका-यांने सदर अटकेसंबधी माहिती कळवणे आवश्यक आहे आणि सदर अटकेसंबंधीची माहिती पोलीस नियंत्रण कक्षातील सहज दिसणा-या नोटीस फलकावर दाखविणे आवश्यक आहे.
झडती घेण्यासंबंधी तरतुदी:
पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी किंवा तपास अधिका-यास दखलपात्र गुन्हयाशी निगडीत कोणत्याही बाबीसाठी आपल्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या कोणत्याही जागेची झडती घेण्याचा अधिकार आहे. संबंधीत पोलीस अधिका-यांने झडती घेण्यापूर्वी आपले ओळखपत्र दाखविणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या गणवेषावर त्याचे नाव आणि पद असलेली नेमप्लेट दिसणे आवश्यक आहे.
धाड घालणा-या पथकाने झडती सुरू करण्यापूर्वी त्यांची तपासणी करण्याचा आणि झडती घेण्याचा तुम्हाला हक्क आहे. झडती चालू असताना दोन प्रतिष्ठीत पंच/साक्षीदार उपस्थित असणे आवश्यक आहे.
झडती पूर्ण झाल्यानंतर संबंधीत अधिका-यांने झडती पंचनामा तयार करणे आवश्यक आहे आणि त्यामध्ये ताब्यात घेतलेल्या वस्तूंचा तपशील नमूद करून त्यावर दोन पंच/साक्षीदार आणि मालक यांच्या स्वाक्ष-या घेणे आवश्यक आहे. ताब्यात घेतलेल्या वस्तूंचा पंचनामा जागेवरच करणे आवश्यक आहे.
पंचनाम्याची प्रत मागणी करण्याचा तुम्हाला हक्क आहे.
वरील नमूद पध्दत अंग झडतीचे बाबतीतही लागू आहे.
पंचनामा:
अटक, झडती, जप्ती या संबधीचा पंचनामा नेहमीच अपघात किंवा अपराध घडलेल्या ठिकाणी करणे आवश्यक आहे आणि त्यावर पंच/साक्षीदार यांच्या स्वाक्ष-या जागेवरच घेणे आवश्यक आहे.
ज्याच्या परिसराची झडती घेण्यात आली त्या आरोपीस/इसमास पंचनाम्याची प्रत मिळालीच पाहीजे.
पंचनामा चालू असताना दोन पंचांनी त्या ठिकाणी उपस्थित असणे आवश्यक आहे आणि पंचनाम्यावर त्यांच्या स्वाक्ष-या घेणे आवश्यक आहे.
नमूना 'एए' (Form 'AA') प्रमाणे शुल्क भरल्यानंतर अपघात स्थळाच्या पंचनाम्याची प्रत प्राप्त करून घेता येते.
माझा अपघात : तुमचे दायीत्व :-
अपघातात कोणीही जखमी किंवा मृत झाले नाही आणि केवळ वाहनांचे नुकसान झाले असेल तर संबंधीत वाहनांच्या चालकांनी आपली वाहने रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही या संबंधी दक्षता घेतली पाहिजे. दोन्ही वाहानांच्या चालकांनी एक दुस-यांची नांवे पत्ते आणि लायसन्सचा तपशील आणि परस्परांच्या वाहनांचे क्रमांक लिहुन घेऊन योग्य प्रकारे स्थानीक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. विमा कंपनीला या संबंधी ताबडतोब कळवले पाहिजे म्हणजे नुकसान झालेल्या वाहनांच्या नुकसान भरपाईचा दावा करता येईल. जर तुम्ही एखादा अपघात करून त्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जखमी केले तर अशा व्यक्तिला रूग्णालयात दाखल करून या घटनेसंबंधी पोलीसांना कळविणे हे तुमचे कर्तव्य आहे. जर जखमी व्यक्तीला रूग्णालयात दाखल करणे शक्य नसेल तर तुम्ही जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन संपूर्ण वस्तुस्थिती सांगणे आवश्यक आहे. जर या नियमाचे अनुपालन करण्यात आले नाही तर तुम्ही वाढीव शिक्षेला पात्र व्हाल.
जर तुम्हाला वाटेत एखाद्या अपघातात जखमी व्यक्ती आढळली तर तिला मदत करण्याचा प्रयत्न करा. जखमी व्यक्तीला प्रथमोपचार देऊन नंतर जवळच्या रूग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न करा. चालकाचा नोंदणी क्रमांक आणि नांव, अपघातास कारणीभूत होणा-या वाहनाचा इतर तपशील लिहून घेणे आणि तो ताबडतोब जवळच्या पोलीस ठाण्यास कळवणे आवश्यक आहे. अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीला मदत केली तर पोलीस त्रास देतात या चुकीच्या कल्पनेवर विश्वास ठेऊ नका. फार तर पोलीस तुम्हाला जबाब नोंदविण्यास सांगतील आणि तो सुद्धा रूग्णालयात.
महिला: विशेष घटक:
महिलांचा योग्य सन्मान राखणे हे प्रत्येक पोलीसाचे कर्तव्य आहे. या नियमाला अपवाद नाही.
ज्या प्रकरणात महिला तक्रारदार असेल अशा प्रकरणात पोलीसांनी चौकशी आणि तपास जलद करणे आवश्यक आहे.
जेव्हा महिलेला अटक करण्याचा किंवा महिला साक्षीदारांकडे चौकशी करण्याचा प्रसंग येतो तेव्हा महिला पोलीस उपस्थित राहतील यासंबंधी दक्षता घेणे पोलीसांवर बंधनकारक आहे.
जर महिला आरोपी असेल तर तिने केलेल्या गुन्हयांचे स्वरूप विचारात न घेता तिची प्रतिष्ठा राखणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे सुर्यास्त आणि सुर्योदय यांच्या दरम्यान महिलेला अटक करू नये किंवा पोलीस ठाण्यात बोलावू नये. तथापी अपवादात्मक परिस्थितीत जर महिलेला अटक करणे किंवा पोलीस ठाण्यात बोलावणे आवश्यक असेल तर अशा महिलेच्या नातेवाईकांना तिच्या समवेत थांबण्याची परवानगी देणे पोलीसांवर बंधनकारक आहे. आरोपी महिलांना त्यांच्यासाठी राखीव असलेल्या खास खोल्यात ठेवण्यात यावे.
बलात्कार पीडीत महिला तीची वैद्यकीय तपासणी महिला डॉक्टरकडून करण्याची मागणी करू शकते.
बलात्कार पीडीत महिला तीचा जबाब महिला पोलीस कर्मचा-यासमोर नोंदवण्याचा पर्याय निवडू शकते. शक्य असेल तेव्हा अशा कामासाठी महिला पोलीस अधिका-याची नेमणूक करावी. जर असे करणे शक्य नसेल तर प्रथम खबर दाखल करताना आणि जबाब नोंदविताना स्थानिक महिला उपस्थित राहील याची खात्री करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पोलीस सर्व नागरीकांशी विशेषतः महिलांशी सभ्य वर्तन करण्यास कटीबद्ध आहेत याबाबत काही कसुरी झाली तर ही बाब वरिष्ठ अधिका-यांच्या लक्षात आणुन दिली पाहीजे.
महिलांचे सरंक्षण आणि महिलांच्या छळाविरूद्ध कायदेशीर कारवाईला चालना देण्यासाठी भारतीय दंड विधानातील खालील कलमात सुधारणा करण्यात आली आहे.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏