लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांचे कार्य आणि रशिया प्रवास भाग : २
रशियात अण्णांचे साहित्य अगोदर पोहचले होते .
दुसऱ्या महायुद्धातील 'स्टालिनग्राची लढाई' पोवाड्यातून आण्णांनी मांडली होती. या पोवाड्याच्या माध्यमातून त्यांनी 'बर्लिन' पर्यंत गरुड झेप घेतली होती, तर 'चित्रा' ही कादंबरी रशियन भाषेत प्रकाशित झाली होती.
मुंबई प्रतिनिधी : इंडो सोव्हिएट कल्चर सोसायटीने रशियास अण्णा भाऊ साठे यांनी जावे असे पत्र अण्णा भाऊ साठे यांना दिले. इंडो सोव्हिएट कल्चर सोसायटीच्या शिष्टमंडळात अण्णा भाऊ साठे यांचा समावेश झाला. रशियाला जाण्यासाठी अण्णा भाऊ साठे पहिल्यापासून उत्सुक होते. त्यांना ही एक रशियाला जाण्याची संधी मिळाली. रशियाला जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसे न्हवते, ही बातमी महाराष्ट्रात पसरताच त्यांच्यावर पैशांचा पाऊस पडला. यातून त्यांची लोकप्रियता दिसून येते. अण्णा रशियाला जाणार तो दिवस उजाडला. अनेक जिवाभावाची लोकं त्यांना भेटण्यास आली. लोकांच्या सूचना, हार फुले, आशीर्वाद, उपदेश, सदिच्छा आणि प्रवासाच्या आनंददायी मंगल कामना घेऊन अण्णा भाऊ साठे १२ सप्टेंबर १९६० रोजी रशियाला जाण्याच्या आनंदात होते. मुंबई ते दिल्ली प्रवास त्यांनी विमानाने केला आणि पुढे दिल्ली (पालम विमानतळ) ते उझबेकिस्तान प्रवास 'चितोडची रानी' विमानाने केला. हा प्रसंग त्यांनी रंगवला आहे. विमानात बसल्यावर आणि विमान आकाशात भरारी घेतानाचे वर्णन छान केले आहे. डोंगर टेकडी सारखे दिसणे, नद्यांना ओघळीचे स्वरूप येणे, इमारती काड्यांच्या पेटी एवढ्या दिसत होत्या तर विमान विमानतळावर उतरल्यावर विमानाने पाय टेकले, हिमालयाचे मस्तक , हिमाचा वर्षाव इ. अशा प्रकारचे वर्णन छान केले आहे. पुढे अण्णांचा सोव्हिएटच्या विमानाने पुढचा प्रवास सुरु झाला. यावेळी ढगांच्या राशीतून मार्ग, अनंत दिव्यांचा पुंजका म्हणजे शहर, ढगांचा पडदा , इ. शब्द प्रयोग प्रवास वर्णनात केले आहे. शेवटी 'मास्को' विमानतळावर विमान उतरले. त्यावेळी तेथे थंडी होती. थंडीचे वर्णन करताना वारे धावणे, आंगाला चावत होते असे छान प्रकारे केले आहे. थंडीवरून 'कझकीना' आणि अण्णा भाऊ साठे यांचा संवाद हस्यकल्लोळ करून जातो. विमानतळावरुन ते मोटारीने शहराकडे जातात. चावरा वारा , डोळ्यातून पाण्याच्या धारा हा शब्द प्रयोग संवादाला उंच पातळीवर घेऊन जातात. सोव्हिएट स्काय आलिशान हॉटेल मध्ये या शिष्टमंडळाची राहण्याची सोय केली गेली. अण्णा भाऊ साठे यांना तेथे दुभाष्यक म्हणून 'बारनिकोव' एक महिना काम करणार होते. अण्णांना रशियात सर्वप्रथम रशियातील माणसं बघायची होती. दोन दिवसात त्यांना बरेच रशियन शब्द माहीत झाले. शिष्टमंडळातील डॉक्टर, वकील, आमदार, लेखक इ. वेगवेळ्या लोकांना त्यांच्या क्षेत्रातील रशियाची प्रगती आणि ठिकाणे पहायची होती. अण्णा भाऊ साठे यांना तर तेथिल फुटपाथनं भटकायचं होतं. ज्याला जे आवडेल ते त्यांनी पहावं असे शिष्टमंडळाने ठरवल्यामुळे प्रत्येकाला आपल्या आवडीप्रमाणे भटकायला आणि फिरायला मिळणार होते म्हणून प्रत्येक जण आनंदी होता. दुसऱ्या दिवशीच्या दूत निवासाच्या निमंत्रणात जात असतांना अण्णा भाऊ यांना रस्त्याचे काम चालू असल्याचे दिसले. देखरेख करणारी सुटबुट घातलेली पाच माणसं एका मोटारी कडून काम करून घेताना पाहिले. माती उकरणे आणि भरणे , डांबर टाकणे हे सर्व काम मोटार करत होती हे निरीक्षण अण्णांनी टिपले. दूत निवासस्थानात पाहुणचार झाल्यावर शिष्टमंडळ लेनिनग्रँडकडे आले. पुढे 'आजारबैजाचा' प्रवास केला. या प्रवासादरम्यानचे रेल्वे प्रवास वर्णन अण्णांनी छान केले आहे. तेथिल रेल्वे प्रवास त्यांना मुंबईतील बोरी बंदर रेल्वे स्टेशनची आठवण करून गेले. ती रेल्वेतील तुफान गर्दी , धावपळ, मारामाऱ्या, गाडीतला होणारा जय घोष, इ. घटनेचा त्यांच्या पुढे प्रसंग तरळत होता. भारतातील धावपळीचा रेल्वे प्रवास व वातावरण आणि रशियातील शांत प्रवास आणि स्वच्छ स्टेशन यांची तुलना त्यांना जाणवत होती. लेनिनग्रँडमध्ये या शिष्टमंडळाचे स्वागत जोरदार झाले. तेथे प्रोफेसर ततियानाबाई आणि मराठी विध्यार्थी यांनी अण्णांची भेट घेतली. तेथील विश्व विद्यालयाला त्यांनी भेट दिली. तसेच रशियातील इतिहास स्थळे त्यांनी पाहिली. उदा. कॉ. लेनिन खोली, उद्यान, महान स्मारक, अग्निकुंडची धगधगती आग, वस्तू संग्रहालय, राजमार्ग, रेखीव इमारती, फुटपाथ, आरशासरखे रस्ते, विविध पुतळे, विविध शहरे इत्यादी. रशियाच्या रस्त्यांवरून 'सप्तवार्षिक योजना' पूर्ण करण्यासाठी धावणारी लोकं अण्णांनी पाहिली. समाजवादाचे यश जनतेच्या खोल मनावर झाल्याचे त्यांना आढळून आले. गेल्या चाळीस वर्षात समाजवादाची प्रतिष्ठा रशियन जनतेने वाढवले आहे, हे ते प्रत्यक्ष डोळ्यांने आज पाहत होते. देशाच्या प्रगतीसाठी आणि देशातील प्रत्येक वस्तू स्वतःची आहे म्हणून काळजी घेणारा नवा समाज, रशियातील नवी दृष्टी आणि सृष्टी त्यांनी पाहिली. रशियाच्या भूतकाळाच्या खुणा, वर्तमानाची प्रगती आणि भविष्याची चाहूल अण्णा भाऊ साठे पाहत होते. ते रशियाचे अपयश शोधत होते. दारिद्र्य त्यांना तेथे दिसले नाही म्हणून हे 'महान ऑक्टोबर क्रांतीचे' यश आहे असे त्यांचे मत झाले. त्यांनी शाळा, महाविद्यालये, दवाखाने, सामुदायिक शेती इ. पाहिले. बोलशेव्हिक थिएटरात दगडाचे फुल ( नृत्य नाट्य रचना) हा ऑपेरा पाहताना नाट्यगृहात एकही जागा शिल्लक नसल्याचे त्यांना आढळून आले. एकावेळी दोनशे वादकांचा ताफा आणि नियोजन पाहून रशियन माणूस कला प्रेमी असल्याचे त्यांना जाणवले. एक बालनाट्य, एक सिनेमा, दिलराम नाटक, ही त्यांनी पाहिला. त्यातील प्रसंग वर्णन त्यांनी पुस्तकात केले आहे.
मास्कोत पहिले भाषण अण्णा भाऊ साठे यांनी मराठीत केले. त्याचे भाषण मराठीतून इंग्रजी आणि इंग्रजीतून रशियन भाषेत भाषांतर करणारे दोन दुभाषेके म्हणजेच दोन भाषेच्या जिभा मिळाल्या होत्या. हा संवाद पण एका ठिकाणी हस्यकल्लोळ करून जातो याची सुरेख मांडणी त्यांनी पुस्तकात केली आहे. पुढे त्यांनी 'बाको' शहर पाहिले. रशियात या शिष्टमंडळातील काही सदस्यांच्या हरवलेल्या वस्तू कॅमेरा, पेन, गिटार परत मिळाल्या म्हणून रशियाच्या योजना बद्ध व्यवहाराचे अण्णा भाऊ साठे यांना आश्चर्य वाटले. नंतर उझबेकिस्तान येथे परत ते आले. तेथे त्यांना बुरखा पद्धत दिसली नाही.
विविध क्षेत्रातील प्रगती पाहून अण्णा थक्क झाले. शेती सुधारणे बरोबर द्राक्षाची बाग आणि त्यांच्या १५ विविध जाती त्यांनी पाहिल्या. रशियन लोकांचा भारताबद्दलचा आदर आणि नेहरू वरील त्यांचे प्रेम अण्णा भाऊ साठे यांना जाणवले. रशियन लोक भारताला खरा मित्र मानतात. भारताचा ते अभ्यास करतात हे त्यांना जाणवले. मराठी आणि हिंदी भाषा शिकणाऱ्या शाळा रशियात त्यांनी पाहिल्या. रशियन लोकांना स्वातंत्र्य प्रिय असल्याचे त्यांना जाणवले. इतिहास जपणारे रशियन लोक त्यांना दिसली.
पुढे रशियातून भारताला येण्याचा दिवस उजाडला . रशियन जेट विमानांनी भरारी घेतली आणि विमान दिल्लीत आलं.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी खूप सुंदर असे प्रवास वर्णन केले आहे. संवाद लेखन मनाला भावते. विमान, मोटार, रेल्वे आणि पायांनी रशियाचा प्रवास यादगार अण्णा भाऊ साठे यांनी केलाच पण तो "माझा रशियाचा प्रवास" या प्रवास वर्णन लिहून चिरकाल पुस्तक रूपाने जिवंत ठेवला ! त्यांनी लिहिलेल्या 'माझा रशियाचा प्रवास' हे पुस्तक मला आवडल्यामुळे या पुस्तकावरून त्यांनी रशियात काय पाहिले ? त्यांना काय जाणवले ? त्यांचे विचार... थोडक्यात पुस्तक परीक्षण म्हणून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या कार्यावर लिहिलेला लेख आणि पुस्तक परीक्षण वाचून हा वाचक अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेले प्रवास वर्णन 'माझा रशियाचा प्रवास' हे त्यांचे पुस्तक आवर्जून वाचतील ही एक अपेक्षा !
पुस्तक : माझा रशियाचा प्रवास याचे लेखक : अण्णा भाऊ साठे आहेत तर या पुस्तकामध्ये प्रवास वर्णनाचे एकूण आठ भाग आहेत. या पुस्तकाचे प्रकाशक गुलाबराव कारले आहेत . या पुस्तकाचे मूल्य ४० रुपये आहे. हे पुस्तक वाचनीय असून आपण जरूर वाचावे असे मला वाटते.
अण्णा भाऊ साठे यांचा जन्म वाटेगांव , तालुका- वाळवा, जिल्हा - सांगली येथे १ ऑगस्ट १९२० रोजी झाला . १८ जुलै १९६९ रोजी अण्णा भाऊ साठे यांचे निधन झाले. अण्णा भाऊ साठे यांना ४९ वर्ष आयुष्य लाभले.
साहित्यिक कलावंत यांना इथल्या वास्तवाबरोबर बाहेरच्या जगाचा कानोसा घेण्याची दूरदृष्टी हवी. असे मला वाटते. अण्णा भाऊ साठे यांनाही बाहेरच्या जगाची दूरदृष्टी होती. त्यांच्या कथा आणि कादंबऱ्या मुलांना अभ्यासक्रमात अभ्यासासाठी आहेत. अण्णा भाऊ साठे यांचा रशियाचा प्रवास हा त्यांचा आयुष्यातला महत्त्वाचा आणि प्रगतीचा टप्पा आहे असे मला वाटते. इथले साहित्यिक कोणत्या दृष्टीने त्यांच्या रशियाच्या प्रवासाला पाहतात हे मला माहित नाही परंतू मी मात्र गरिबीला पायदळी तुडवत, क्षितिजा पलीकडे पाहणारे, आपल्या लेखणीच्या जोरावर आणि कार्यामुळे रशियाला जाणारे अण्णा भाऊ साठे यांना मी मानतो. वाटेगावहून मुंबईसाठी येण्यासाठी पायी प्रवास करणारे अण्णा भाऊ साठे जेव्हा विमानाने रशियाचा प्रवास करतात. या प्रवासा पाठीमागे त्यांचे प्रचंड कष्ट आणि त्याग लपलेला आहे याची जाणीव होते.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏