लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे हे दोन्ही महापुरुष होते

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृतीशताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी समारोह मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न


लोकमान्य टिळक आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे हे दोन्ही महापुरुष शब्दप्रभू होते


    - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



मुंबई प्रतिनिधी : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृतीशताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी हे एकत्र असणे एक योगायोग आहे. या दोन्ही महापुरुषांबद्दल आपण काय बोलावे, यापेक्षा आपण त्यांच्याकडून काय घ्यावे, हे अधिक महत्वाचे आहे. हे दोन्ही महापुरुष शब्दप्रभू होते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृतीशताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्म शताब्दी समारोह कार्यक्रम ऑनलाईन आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे  उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते  करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा, संचालक डॉ. धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, सर्व अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू,कुलसचिव,विद्यार्थी ऑनलाईन सहभागी झाले होते


          मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, या दोन्ही महापुरूषांकडे मत-हिंमत आणि किंमत होती. स्वतःचे मत होते आणि ते मत मांडण्याची हिंमत त्यांच्यात होती आणि त्याही पलीकडे जाऊन  होणारे परिणाम आणि त्यासाठी मोजावी लागणारी किंमत हे सगळे पचविण्याची ताकद त्यांच्यात होती. कोणत्याही परिणामांची पर्वा न करता त्यांनी आपले परखड मत मांडले. निवडणूक-सत्ता-अधिकार नसताना देशाचे नेतृत्व करणे सोपे नव्हते, त्याकाळी जनजागृतीसाठी मीडिया सारखे माध्यम नसताना जनतेला जागं करण्याचे कार्य त्यांनी केले.घराघरात साजरा होणारा गणेशोत्सव हा सार्वजनिक केला.टिळकांच्या आयुष्यात अचूकतेला खूप महत्व होते. गणित आणि संस्कृत या विषयामध्ये त्यांचे प्रभुत्व होते. टिळकांच्या प्रेरणेच्या उर्मीने देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यांना अपेक्षित असणारे स्वराज्य आपण निर्माण करणे अपेक्षित आहे.


अण्णाभाऊंचे नाव घेतल्याशिवाय संयुक्त महाराष्ट्र चळवळ पूर्ण होऊ शकत नाही - मुख्यमंत्री


      अण्णा भाऊंचे नाव घेतल्याशिवाय संयुक्त महाराष्ट्र चळवळ पूर्ण होऊ शकत नाही त्यांच्या साहित्यातून त्यांनी जनजागृती करून चळवळीला नवसंजीवनी देऊन एक चैतन्य निर्माण केले. शाळेत न गेलेल्या माणसाचे जन्मशताब्दी वर्ष विद्यापीठ साजरे करतेय. ही खूप प्रेरणादायी बाब आहे. आज या दोन्ही महापुरुषांच्या नावे मुंबई विद्यापीठामध्ये अध्यासन केंद्र चालू केले जात आहेत, ही चांगली बाब आहे. या दोन्ही महापुरुषांचा समर्थ वारसा घेऊन पुढचा इतिहास आपण निर्माण केला पाहिजे.असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी संगितले.


समाजामध्ये चेतना निर्माण करण्याचे काम या दोन्ही महापुरुषांनी केलं  - बाळासाहेब थोरात


       महसूल मंत्री थोरात यावेळी म्हणाले, भारतीय समाजामध्ये चेतना निर्माण करण्याचे काम लोकमान्य टिळकांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या लढाईचा पाया रचण्याच्या कार्यामध्ये ते अग्रस्थानी होते. सर्वांना एकत्र घेऊन लढण्याची ताकद त्यांच्यात होती. अण्णाभाऊ साठे यांनी दर्जात्मक साहित्य निर्माण केले.  संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.


लोकमान्य टिळक आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या अध्यासन केंद्रासाठी  शासनाकडून सहकार्य - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत


       लोकमान्य टिळक यांचा ज्या रत्नागिरी जिल्ह्यात जन्म झाला तेथील मी लोकप्रतिनिधी आहे, याचा मला अभिमान आहे. या माध्यमातून या कार्यक्रमाची संकल्पना निर्माण झाली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृतीशताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित शासन आणि विद्यापीठ स्तरावर पुढे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.या दोन्ही महापुरूषांच्या नावे मुंबई विद्यापीठात अध्यासन केंद्र सुरु केले जाणार आहे. यासाठी शासनाकडून सर्व सहकार्य केले जाईल.


        चरित्र साधने समितीच्या माध्यमातून आपण महापुरुषांची चरित्रे प्रकाशित करीत असतो. आजच्या या दिनी छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने समिती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चरित्र साधने समितीचा शासन निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. या माध्यमातून महापुरूषांचे कार्य सगळ्यांना उपलब्ध होईल. लोकमान्य टिळक यांच्या नावे रत्नागिरी येथे स्मारक आणि ग्रंथालय आहे. या ग्रंथालयाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. या दोन्ही ऐतिहासिक वास्तूला शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी  विनंती मंत यांनी यावेळी केली.   लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर अनेक चित्रपट निघाले आहेत. त्यांनी साहित्यामध्ये आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे. या दोन्ही महापुरुषांचा आदर्श घेऊन नवीन पिढी स्वत: ची प्रगती करेल, असा विश्वासही सामंत यांनी  यावेळी व्यक्त केला.


       विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य लढ्याला विलक्षण अशी दिशा टिळकांनी दिली. हजारो-लाखो क्रांतिवीरांना प्रेरणा देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या संकल्पनेतून सामाजिक एकता त्यांनी निर्माण केली. त्यांनी शिवजयंती महोत्सव संपूर्ण देशभर साजरा करण्यास सुरूवात केली.अण्णा भाऊ साठे यांनी वर्गरहित समाजाचे स्वप्न बाळगले. शाळेची पायरी न चढलेल्या अण्णाभाऊंनी विपुल साहित्य निर्माण केले आहे. त्यांच्या साहित्यात प्रांजळपणा आहे, वास्तवता आहे. त्यांचे साहित्य जगातील विविध परकीय भाषेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचले आहे. असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संगितले.


          राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी आपल्या तत्वांशी कधीही तडजोड केली नाही. अण्णा भाऊंनी तळागाळातील लोकांना उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले आहे. लोककलेला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कार्य त्यांनी  केले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली.  प्रा.राजा दीक्षित आणि सचिन साठे यांनी  आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावरील चित्रफित दाखविण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी केले. आणि आभार प्र -कुलगुरू रविंद्र कुलकर्णी यांनी मानले.


    दिगंबर वाघ                


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏