कोविड सेंटर्समधील महिलांची छेडछाड टाळण्यासाठी उपाययोजना

कोविड सेंटर्समधील महिलांची छेडछाड टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात


राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक तातडीने होण्याची गरज


     - केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा



मुंबई प्रतिनिधी : कोविड सेंटर्समध्ये महिलांच्या छेडछाडीचे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच महिलांच्या तक्रारींप्रकरणात तातडीने लक्ष घालून सुनावणीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक होणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी आज सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.


      राज्यातील महिलांशी संबंधित प्रकरणांमध्ये सुनावनीसाठी गेले दोन दिवस मुंबईत दौऱ्यावर आल्याचे सांगून शर्मा म्हणाल्या की, राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रकरणांची सुनावनी प्रलंबित आहे. तसेच कोविड सेंटर मध्ये बलात्कार, विनयभंग, छेडछाडीच्या घटना झाल्याची 11 प्रकरणे केंद्रीय महिला आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्याअनुषंगाने राज्याचे मुख्य सचिव, मुंबईचे पोलीस आयुक्त आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. कोविड सेंटरमध्ये होणाऱ्या छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी राज्याची प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) असल्याचे सांगण्यात आले. एसओपीबरोबरच अन्य उपाययोजनांचेही काटेकोर पालन होणे गरजेचे आहे.


      महिलांवरील अत्याचार प्रकरणात मदत, समुपदेशन आदी सहाय्य करण्यासाठी सध्या कार्यरत असलेली वन स्टॉप सेंटर्स चांगल्या पद्धतीने काम करत असून राज्यातील उर्वरित 19 जिल्ह्यात वन स्टॉप सेंटर्स कार्यरत करणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्य रिदा रशीद उपस्थित होत्या.


 दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..