मीरा भाईंदर येथील विकासकामांचे ई भूमिपूजन

मीरा भाईंदर येथील विविध विकासकामांचे ई भूमिपूजन आणि  लोकार्पण


मीरा भाईंदर शहराच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबद्ध


-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



ठाणे प्रतिनिधी : मीरा भाईंदर शहर हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे.या शहराच्या सर्वांगिण विकासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याबरोबरच विकासकामांसाठी पुरेसा निधी कुठलाही भेदभाव न करता उपलब्ध करुन देण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.मीरा भाईंदर येथील विविध विकासकामांचे ई भूमिपूजन आणि  लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये  हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे कलादालनाचे भूमीपूजन, हिंदुहृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे मैदानावर उभारलेल्या कोविड रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा तसेच मिरा-भाईंदर RTPCR कोविड-19 टेस्टिंग लॅबचे लोकार्पण आणि  काशिमिरा, प्रभाग-14 येथील BSUP प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने MMRDA मार्फत कर्जस्वरुपात दिलेल्या निधीचे महानगरपालिकेला समर्पण या कार्यक्रमांचा समावेश आहे.


    या कार्यक्रमास नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, आमदार रविंद्र फाटक, महापौर ज्योत्स्ना हसनाळे ,आयुक्त विजय राठोड ,मनपा लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.


आरोग्याची शिस्त पाळा


    यावेळी  मुख्यमंत्री  ठाकरे  म्हणाले , आपल्याकडे अलिकडच्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण आणि आलेख घटतांना  दिसत असला तरी  खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.कोरोनाशी लढतांना आपण राज्यभर जम्बो आरोग्य सुविधा उभ्या करत आहोत,  आपले डॉक्टर, नर्सेस आणि इतर कोविड योद्धेही आपल्यासाठी गेली कित्येक महिने अथक परिश्रम घेत आहेत. धोका टळलेला नाही. तसेच अद्याप ठोस असा उपाय अथवा लस सापडलेली नाही. त्यामुळे योग्य पद्धतीने काळजी घेणे सावध रहाणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात  दुसरी लाट येऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकाने शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे.


     मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाने करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कलादालनाच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना संधी उपलब्ध करुन देण्यात येत असुन ही बाब विशेष कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.शहरामध्ये सुरु असलेल्या विकासकामांसंदर्भात त्यांनी समाधान व्यक्त केले.मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्व शहरवासियांना प्रकाशपर्व दिपावलीच्या आरोग्यमय शुभेच्छा दिल्या.


दिवाळीनंतर अधिक सावधगिरी


     पालकमंत्री  एकनाथ शिंदे म्हणाले, आजही   कोरोना संकट टळलेले नाही.मुख्यमंत्री यांच्या आवाहनाला जनता प्रतिसाद देते आहे.सर्व यंत्रणा विशेष प्रयत्न करते आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ मोहिमेमुळे कोरोनाचे रुग्ण कमी होण्यास मदत होणार आहे. दिवाळीनंतर रुग्ण वाढू शकतात हे लक्षात घेवून उपाययोजना राज्यशासन करीत आहे.भविष्यात दुसरी लाट येण्याची शक्यता आहे.त्यासाठी पुरेशी व्यवस्था असण्याच्या दृष्टीने या सुविधांचे लोकार्पण करण्यात येत  आहे.नागरिकांनी खबरदारी घ्यावी तसेच शासनाच्या मार्गदर्शक नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, आमदार रविंद्र फाटक, महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मनपा आयुक्त डॉ.विजय राठोड यांनी केले.


अशा आहेत विविध सुविधा


    भाईंदर (पूर्व) येथे मौजे गोडदेव आरक्षण क्र.१२२ मैदान व सामाजिक, जागेत ४१४७.५६ चौरस मीटर क्षेत्राची तळ अधिक एक मजल्याचे हिन्दू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख मा. श्री. बाळासाहेब ठाकरे कला दालन बांधण्यास रु. ३८ कोटीच्या निधीस मान्यता प्राप्त आहे. सायन्स सेंटर, वाचनालय एक्झीबिशन हॉल, अॅम्फी थिएटर, सुविधा क्षेत्र, वरीष्ठ नागरीक विरंगुळा, चिल्ड्रन गेम्स, स्कल्पचर, पेन्टींग हॉल, लॉबी, व्ही. आय.पी. रुम्स, कॅफेटेरीया इ. कामाचा समावेश आहे.


 मॉलेक्युलर सोल्युशन कोविड-१९ RT-PCR प्रयोगशाळा


      मिरा-भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पहिली शासकीय मॉलेक्युलर प्रयोगशाळा,पूर्णपणे स्वयंचलित RNA एक्स्ट्रॅक्शन मशीन, दरदिवशी ७००-८०० कोविड स्वंब नमूने तपासणीची सोय,इत्यादी सोयी आहेत.


स्व.बाळासाहेब ठाकरे DCHC जंबो फॅसिलिटी


     या ठिकाणी एकाच वेळी ७२० कोविड रुग्णवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध,  उभारणीसाठी १२.०९ कोटी खर्च अपेक्षित आहे. ७२० पैकी ३०० खाटा या ऑक्सिजन सुविधेसह उपलब्ध असून ४२० खाटा विना ऑक्सिजनसह आहेत. ८ खाटा या अतिदक्षता सुविधेसह आहेत, त्या ठिकाणी ४ व्हेंटीलेटर्स उपलब्ध करुन देण्यांत आले आहेत. तसेच इतर आवश्यक उपकरणे व साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. बी.एस.यु.पी.योजनेतील फेरनिविदा मागविलेल्या व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कर्ज निधीतून करावयाचे कामे


     जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय पुनरुत्थान अभियान अंतर्गत (JNNURM) शहरी गरीबांना मुलभुत सुविधा पुरविणे (BSUP) उप कार्यक्रम अंतर्गत मिरा-भाईंदर महानगरपालिकेचा ४१३६ सरदनिकाचा प्रकल्प केंद्र शासनाने मंजुर केला होता.  योजना बंद झाल्याने उर्वरित कामे महानगरपालिकेस स्वनिधी उभारुन पूर्ण करावयाची आहेत. कामांसाठी  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून १५० कोटीचे कर्ज घेण्यास शासनाने मान्यता दिलेलो आहे. सद्यस्थितीत इमारतीचे काम पुर्ण होऊन १७९ सदनिकाचा ताबा देण्यात आलेला आहे. तीन इमारतीची कामे सुरु आहेत. तसेच तीन इमारतींच्या कामांसाठी फेर निविदा मागवून कंत्राटदाराची नेमणुक करण्यात आलेली आहे. तीन इमारती मध्ये ९६० सदनिका बांधण्यात येणार असून त्याकरीता रु.११८ कोटी खर्च अपेक्षित आहे. सद्यस्थितीत एम.एम.आर. डी.ए. प्राधिकरणामार्फत ४० कोटीचे कर्ज मंजुर करण्यात आलेले आहे.


दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..