कलम ''६ क'' नुसार वारसा नोंद कशाप्रकारे घ्यावी.


 
संपादकीय वारसांच्या नोंदी 
जन्म आणि मृत्यू कोणालाही चुकलेला नाही एकाद्या शेतकरी कुटुंबातील प्रमुख व्यक्ती जीच्या नावावर शेतजमिन आहे अशी ती मयत झाली असता त्याचे मालकीच्या जमीनीवर वारसांची नावे लावतात त्याला वारस नोंद असे म्हणतात. वारस नोंदीमुळे त्या मालका हक्क मिळण्यास मदत होते. मयत खातेदाराच्या वारसांची नोंद घेतली जात त्या नोंदवहीस गाव नमुना 6 क असे म्हटले जाते

गाव नमुना 6 क  या नोंदवहीत अनुक्रमे रकाना क्र. 1 अनुक्रमांक

गावामध्ये मयत झालेले जे खातेदार आहेत व ज्यांचे मत आ वर्दी अर्ज प्राप्त झाले आहेत. अशा अर्जाचा पुढचा अनुक्रमांक या रकान्या खाली लिहिला जातो.

रकाना क. 2 मृत खातेदाराचे नाव

जो खातेदार मयत आहे अशा खातेदाराचे नांव यात नमूद केले जाते.

रकाना क. 3 मृत्युचा दिनांक

या रकान्यात मयत खातेदाराचा मृत्यूचा दिनांक लिहीला जातो.

रकाना क. 4 गाव नमुना 8 अ मधील जुने खाते क

मयत झालेल्या खातेदाराच्या नावे गावात एकूण किती जमीन आहे व ती दर्शविणा-या 3 अ उता-यावरील खाते क्रमांक या रकान्यामध्ये लिहीला जातो

रकाना क. 5 कायदेशीर वारसाची नांवे या रकान्यामध्ये मयत खातेदाराचे आपण कायदेशीर वारस आहोत असा दावा करणा-या वारसांची नावे लिहीली जातात..

रकाना क्र. 6 प्रत्यक्ष कब्जा असलेल्या वारसाची नांवे

रकाना 5 पैकी ज्या वारसांच्या ताब्यात प्रत्यक्षरित्या जी जमीन आहे त्या वारसांची नांवे या रकान्यात नमुद केली जातात.

रकाना क. 7 भोगवटदार म्हणून किवा इतर अधिकारात स्तंभामध्ये कोणाची नोंद करावी यासंबंधी तहसिलदारांचा निर्णय / तहसिलदारांचा आदेश

प्रत्यक्ष कोणत्या वारसांची नांवे 7/12 ला लावली गेली पाहिजेत या संदर्भात स्थानिक चौकशी करून तहसिलदार किंवा मंडळ अधिकारी निर्णय देतात. असा निर्णय संक्षिप्तरित्या रकाना क 7 मध्ये लिहीला जातो.

रकाना क्र. 8 निर्णय संनिविष्ट असलेली गाव नमुना सहा मधील नोंद / प्रमाणित करण्यात आलेल्या फेरफारचा क्रमांक.

एकदा वारस ठराव मंजूर करून कोणाचे नांव लावावे असे निश्चित केले की, त्यानंतर फेरफार रजिस्टरला वारस नोंद लिहीली जाते. त्यामुळे फेरफार रजिस्टरच्या पुढचा अनुक्रमांक रकाना 8 मध्ये लिहीला जातो. असे 8 रकाने असतात त्या रकान्यात माहिती भरली जाते. ती माहिती भरते वेळी विविध कायदे व पध्दतीचा अवलंब करावा लागतो. खातेदार मयत झाला त्याची वर्दी मिळाली लगेच त्याचे वारस नोंदा असे होत नाही. ही संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर पार पाडावी लागते.

वारस नोंद वहीतील वारसांची नोंद करताना काय करावे.

1. सर्व कायदेशीर वारसांची नोंद रकाना 5 मध्ये करावी लागते व 

2. जमिनीचा प्रत्यक्ष ताबा असणा-या वारसांची नोंद रकाना 6 मध्ये करावी लागते.

3. एकत्र कुटुंबातील वारसांची नांवे रकाना 5 मध्ये दर्शवून ताबा सर्वाना दाखवावा. 4. विहीरीतील हिस्से तथा झाडावरील हिश्यांची नोंद इतर हक्कात करावी.

इतर हक्कात नोंदविण्यात येणाऱ्या वरसांची नांवे

1. लग्न झालेली मुलींची नोंद -

मृत खातेदारांच्या मुलींची लग्ने झाली असेल तर त्या मुली जरी कायदेशीर वारस असल्या तरी त्यांचे नांवाची नोंद अधिकार अभिलेखाच्या कब्जेदार रकाण्यात करता येणार नाही तर ती इतर हक्कात करावी लागते. 

2. प्रत्यक्ष ताबा नसलेले वारस

याच प्रमाणे इतर वारसांचा जमिनीवर प्रत्यक्ष कब्जा नाही त्यांचे नावांची नोंद सुध्दा हक्क अभिलेखाचे कब्जेदार रकान्यात न करता तो इतर हक्कात करावी लागते.

एखांदा खातेदार मयत झाल्यास 3 महिन्यांच्या आत वारस नोंदणी करीता खबर / वर्दी/ अर्ज देणे अपेक्षित असते. मयत झालेल्यां खातेदाराची वर्दीच्या वेळी खालील माहिती असल्यास संबंधीत कामाला गती देता येईल.

1. वर्दी अर्ज देते वेळी मयत खातेदार किती तारखेस मयत झाला आहे.

2. मयत खातेदाराचे नावावर कोण कोणत्या गटामध्ये किती क्षेत्र 4 आहे.

3. मयत खातेदाराला एकूण किती वारस आहेत?

4. अर्जासोबत मयत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला जोडावा

5. मयत व्यक्तीच्या नावावरील जमीनीचे 8 अ चे उतारे जोडावे

6. मयताचे सर्व वारसदारांचे नांव पत्ते व मयताशी वारसांचे असणारे नाते संबध शपथेवरील प्रतिज्ञापत्रासह सादर करावे.

हिंदू व्यक्तीच्या बाबत हिंदू उत्तराधिकार अधिनियम 1956 चे तर मुस्लिम व्यक्ती खातेदारांच्या बाबत मुस्लीम कायद्याचे नियम पाळले जातात. थोडक्यात  वारसांच्या नोंदी घेत असताना व्यक्तीचा जो धर्म आहे त्या कायद्यानपुसार होतात. मृत्युपत्र न करता मृत झालेल्या हिंदु, शिख, बौद्ध व जैन व्यक्तींसाठी हिंदू उत्तराधिकार अधिनियम 1956 तर  पार्शी, ख्रिश्चन, विशेष विवाह नोंदणी कायदा 1954 च्या तरतूदीप्रमाणे विवाह केलेल्या हिंदु व्यक्ती व हिंदु अगर इतर धर्माचच्या व्यक्तीने मृत्युपत्र करुन ठेवलेली मिळकत भरती उत्तराधिकार अधिनियम 1925 लागू होतो.

वारस नोंदीतल महत्त्वाच्या बाबी

1. व्यक्तीने स्वकष्टाने मिळविलेल्या जमीन बाबत सर्व प्रथम हक्क त्याचे मुले मुली विधवा बायको आणि आई यांना मिळतो. स्वकष्टाने मिळविलेल्या जमीनीत मयत व्यक्तीच्या वडीलांना कोणताही प्रकारचा हक्क मिळत नाही.

2. वडीलांच्या अगोदर मुलगा मयत झाला असेल तर त्याच्या मुला व मुलींना मिळून एक वाटा मिळतो.

3. पहिली पत्नी जीवंत असताना दुसरे किंवा तिसरे लग्न झालेल्या मयत व्यक्तीच्या पत्नीला वारस हकक राहत नाही परंतू त्याना झालेल्या मुला मुलींना मालमत्तेमध्ये हिस्सा मिळतो.

वरील कायद्यातील महत्वाच्या तरतूदींची माहिती मिळविणे तलाठी व इतर महसूल अधिकारी यांचे दृष्टीने महत्वाचे असते. गाव नमुना नंबर 6 क मध्ये प्रथम वारसाची नोंद केली जाते. स्थानिक चौकशी करून मयत खातेदाराचे सर्व कायदेशीर वारस वारस नोंदवहीत नोंदविले आहेत याची खात्री झाल्यानंतर प्रमाणन अधिकाऱ्याने ही नोंद मंजूर करावयाची असते व त्यावरुन लगेच फेरफार रजिस्टरमध्ये नोंद घेऊन ती मंजूर करुन अधिकार अभिलेखात वारसदारांची नोंद दाखल केली जाते.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८