शेतकऱ्यांनी माती परीक्षण करावे

माती परीक्षणाबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणीवजागृती निर्माण करावी


- कृषीमंत्री दादाजी भुसे



जागतिक मृदा दिनी ग्रामस्तरावर जमीन आरोग्य पत्रिकेचे होणार वाचन


मुंबई प्रतिनिधी : 'जागतिक मृदा दिवस 5 डिसेंबर 2020 रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी ग्रामस्तरापासुन ते जिल्हास्तरावर लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या उपस्थितीत जमिन आरोग्य पत्रिकेचे वाचन करुन शेतकऱ्यांना खतांच्या शिफारशीबाबत, जमिनीच्या आरोग्याबाबत खतांच्या संतुलीत वापराबाबत कृषि विद्यापिठांच्या तज्ञांमार्फत मार्गदर्शन करावे. माती परीक्षणाबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन कृषिमंत्री श्री. दादाजी भुसे यांनी केले आहे. जमिनीचे आरोग्य बिघडण्याचा धोका लक्षात आल्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाच्या 68 व्या सर्वसाधारण सभेत 2015 आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष' म्हणून घोषित केले आहे. जमिनीच्या आरोग्याबाबत संपूर्ण जगात याबाबतचा संदेश पोहचविणे तसेच शेतकरी व समाजात शेतजमिनीच्या आरोग्याबाबत जाणीवजागृती करून देणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे आणि त्या वर्षापासुन 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस' म्हणुन साजरा केला जातो.


      राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमिन आरोग्य पत्रिका ही योजना राज्यात कार्यान्वीत झालेली आहे. जमिन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातुन शेतजमिनीच्या रासायनिक गुणधर्माची स्थिती, प्रमुख अन्नद्रव्यांची पातळी व सूक्ष्म मूलद्रव्य कमतरता स्थितीची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येते. त्यानुसार पिकांना खत मात्रांच्या शिफारसी उपलब्ध होणार आहेत. यामुळे खताच्या संतुलीत व कार्यक्षम वापरास प्रोत्साहन मिळणार असून जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यास मदत होणार आहे.  यावर्षीच्या जागतिक मृदादिनी राज्यभर जिल्हा, तालुका व गावपातळीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीमध्ये जमिन सुपिकता निर्देशानुसार खरीप व रबी हंगामातील प्रमुख पिकाना आवश्यक खत मात्रा (नत्र, स्फुरद, पालाश) शिफारशीचे फलक दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात प्रामुख्याने जमिन आरोग्य पत्रिकेचे वाचन करुन शेतक-यांना खतांच्या शिफारशीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


  दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


 🙏 सावधानी बाळगा कोरोना पासून बचाव करा 🙏