पर्यटक म्हणून नागरिकांना जेल पाहता येणार

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे साक्षीदार असलेली कारागृहे पाहण्यासाठी गृहविभागाद्वारे प्रथमच 'जेल पर्यटन' -गृहमंत्री अनिल देशमुख

 मुंबई प्रतिनिधी : भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे साक्षीदार असलेली कारागृहे पाहण्यासाठी गृहविभागाद्वारे प्रथमतच 'जेल पर्यटन सुरु करण्यात येत आहे.दि.26 जानेवारी 2021 पासून येरवडा कारागृह हे कारागृह पर्यटनासाठी खुले असेल.या प्रकल्पाचे उद्घाटन मंगळवारी 26 जानेवारी रोजी दुपारी 12.00 वाजता  मुख्यमंत्री व  उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.  

        भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रातील कारागृहांना अनन्य स्थान आहे, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान नेत्यांना ब्रिटीशांनी येरवडा कारागृहात तसेच इतर कारागृहांतही जसे की ठाणे, नाशिक, धुळे व रत्नागिरी येथे कैद करुन ठेवले होते. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, मोतीलाल नेहरु, पंडीत जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू, सुभाषचंद्र बोस या थोर नेत्यांना ब्रिटीशांनी येरवडा कारागृहात कैद करुन ठेवले होते. या थोर नेत्यांच्या कारावासाची ठिकाणे स्मारक म्हणून जतन करण्यात आलेली आहेत व ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी या थोर नेत्यांनी केलेल्या त्यागाचे स्मरण देत राहतात.

           डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये प्रसिध्द असा पुणे करार झाला तो याच येरवडा कारागृहात गांधी यार्ड असलेल्या आंब्याच्या झाडाखाली झाला. त्या झाडाची सुध्दा योग्य प्रकारे देखभाल करण्यात येत आहे. इ.स. 1899 मध्ये चापेकर बंधूना येरवडा कारागृहातच फाशी देण्यात आली. तसेच जनरल वैद्य यांच्या हत्येप्रकरणी कुप्रसिध्द जिंदा व सुखा यांना सुध्दा येरवडा कारागृहातील वधस्तंभावर फाशी देण्यात आली आहे. दि. 26.11.2008 रोजीच्या मुंबई हल्ल्यातील कुप्रसिध्द अतिरेकी अजमल कसाबला सुध्दा याच कारागृहात फाशी देण्यात आली.

          शाळा/कॉलेज/विद्यापीठ व शैक्षणिक आस्थापना तसेच नोंदणीकृत अशासकीय संस्थाना ही ऐतिहासिक ठिकाणे पाहता यावीत या दृष्टीकोनातून गृह विभाग याद्वारे प्रथमतःच 'जेल पर्यटन' सुरु करीत आहे. यामुळे विद्यार्थी आणि शैक्षणिक आस्थापना, अशासकीय संस्थाच्या प्रतिनिधींना भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आणि येरवडा कारागृहात घडलेल्या इतर ऐतिहासिक घटना पाहता व अनुभवता येतील. या ठिकाणी उल्लेख करणे प्रसंगोचित आहे की, कारागृहे ही समाजातील लोकांच्या प्रवेशासाठी मनाई असलेला भाग आहे.

पुरेशी दक्षता

          हा पर्यटन उपक्रम राबविताना सुरक्षेचे उल्लंघन होणार नाही, तसेच अनिष्ट घटकांना प्रवेश मिळणार नाही याची कारागृह प्रशासन योग्य ती काळजी घेईल. तसेच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर पुरेशी दक्षता घेतली जाईल.पर्यटकांना माहिती देण्यासाठी पर्यटन गाईड पुरविला जाईल. दररोज भेट देण्याच्या पर्यटकांची संख्या 50 पेक्षा जास्त असणार नाही. येरवडा कारागृहास पर्यटक म्हणुन भेट देणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी त्यांच्या संस्थेच्या लेटरहेडवर अर्ज करताना पर्यटक म्हणुन भेट देणाऱ्या व्यक्तींची नावे व मुलभुत तपशील याचा उल्लेख करणे आवश्यक राहिल.

        सदरील अर्ज अधीक्षक येरवडा कारागृह यांच्या yerwadacpmh@gov.in किंवा spycppune@gmail.com या मेलवर अथवा प्रत्यक्षपणे कारागृह येथे किमान सात दिवस अगोदर करावा. येरवडा कारागृहाचा संपर्क क्र.020-26682663/020-29702586 आहे. संपर्कासंदर्भात काही मुद्दा असल्यास भेट देवु इच्छिणाऱ्या व्यक्तींनी अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनी क्र.9823055177 यावर संपर्क साधावा. पर्यटक म्हणुन भेट देणाऱ्या व्यक्तींनी पुढील नमुद केलेले जसे की,आधार कार्ड, संस्थेचे ओळखपत्र किंवा पासपोर्ट यापैकी कोणताही दस्तऐवज सादर करुन ओळख सिद्ध करणे अपेक्षित आहे. कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ, बॅगेज, मोबाईल फोन, कॅमेरा, पाण्याची बाटली किंवा कोणतीही वस्तु कारागृहाच्या आतमध्ये नेता येणार नाही, याची नोंद घ्यावी. कारागृह प्रशासनाने फोटोग्राफी तसेच व्हीडीओग्राफीची व्यवस्था केलेली असुन ते कारागृहातुन बाहेर पडल्यानंतर पुरविण्यात येईल. तथापि, कारागृह विभागाला अनिष्ट व्यक्तीस प्रवेश नाकारण्याचा अधिकार असेल.

   तसेच ही योजना लवकरच महाराष्ट्रातील इतर कारागृहातही राबविण्यात येईल असे  देशमुख यांनी सांगितले

दिगंबर वाघ             

            कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


         🙏  एक वचन तीन नियम  🙏

    १) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा