मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या

गोसेखुर्द धरणाच्या कामाची पाहणी करून परततांना

मुख्यमंत्री जेव्हा स्वत: गाडीतून उतरून शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतात....

नागपूर प्रतिनिधी :  राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या व्यथा मांडण्यासाठी वाट पाहणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आनंदाचा धक्का बसला जेंव्हा अचानक मुख्यमंत्र्यांचा ताफा त्यांच्याजवळून जातांना थांबला आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गाडीतून उतरून शेतकऱ्यांत मिसळले आणि त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. दुपारी नागपूर दौऱ्यात गोसेखुर्द धरणाच्या कामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी  घोडाझरी शाखा कालवा येथे भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांच्या गाड्यांचा ताफा काही अंतरावरील  हेलिपॅडकडे जाण्यासाठी निघाला तेवढ्यात शेतकऱ्यांचा घोळका हातात कागद घेऊन थांबला असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आले, त्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी वाहने थांबविण्याचे आदेश दिले व ते स्वत: झटकन गाडीतून उतरून जमलेल्या शेतकऱ्यांकडे गेले.

     यावेळी शेतकऱ्यांनी 15 वर्षांपासून गोसेखुर्द धरणातील पाण्याचा एकही थेंब चंद्रपूरमधील शेतकऱ्यांना न मिळाल्याने काहीच फायदा मिळत नसल्याची व्यथा मांडली, मोबदला मिळाला नाही अशी तक्रारही त्यांनी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी आस्थेवाईकपणे सर्वांशी बोलून आणि त्यांच्या व्यथा जाणून घेऊन यावर तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात येतील असे सांगितले. मुख्यमंत्री स्वत: थांबून आपले म्हणणे ऐकून घेत आहेत यावर शेतकऱ्यांनी त्यांचे मनापासून आभारही मानले.

घोडाझरी शाखा कालव्याच्या कामाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

       चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड-ब्रम्हपुरी रस्त्यावरील गोसेखुर्द प्रकल्पातील घोडाझरी शाखा कालवा येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालव्याच्या चालू असलेल्या कामाला भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.प्रकल्पाची किंमत कोणत्याही परिस्थितीत वाढणार नाही आणि कामे वेळेत पूर्ण होईल याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही मुख्यमंत्री  ठाकरे यांनी सांगितले.यावेळी गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता वेमुल कोंडा यांनी मुख्यमंत्र्यांना घोडाझरी शाखा कालव्याविषयी माहिती दिली. 

      घोडाझरी शाखा कालवा हा गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचा घटक आहे. गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या 36.76 किमी वरून घोडाझरी शाखा कालवा उगमीत असून एकूण लांबी 55 किमी आहे. घोडाझरी शाखा कालव्याच्या लाभ क्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 5 तालुके(ब्रह्मपुरी, नागभीड सिंदेवाही, मुल व सावली) येतात. यातील 19 गावात 29 हजार 61 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. डिसेंबर 2021 मध्ये पूर्ण होणाऱ्या काही कामांमुळे 9 हजार हेक्टर  क्षेत्रात शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ  होणार आहे. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी निधीची आवश्यकता असून निधी लवकर मिळाल्यास  डिसेंबर  2023 पर्यंत या शाखा कालव्याचे काम पूर्ण होऊन शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने सिंचनासाठी पाणी उपलब्ध  होईल, अशी माहिती वेमुल कोंडा  यांनी दिली.

     यावेळी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, अप्पर मुख्य सचिव विजय कुमार गौतम, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता वेमुल कोंडा, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता कपोले, गोसेखुर्द प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता अ.का देसाई, घोडाझरी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पु. म. फाळके, अधीक्षक अभियंता काटपल्लीवार उपस्थित होते.



दिगंबर वाघ             

कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 🙏 सावधानी बाळगा कोरोना पासून बचाव करा 🙏