महाराष्ट्र एकवटतो तेव्हा तो जिंकतो, कोरोना विरुद्ध एकवटून त्याला हरवूया
मुंबई प्रतिनिधी : कोरोना चाचण्यांमध्ये, लसीकरणात, सुविधा उभारणीमध्ये आणि दर्जेदार रुग्णसेवा देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य क्रमांक एक वर आहे. महाराष्ट्र एकवटतो तेव्हा तो जिंकतो. कोरोना विरुद्ध अशाचप्रकारे एकवटून त्याला हरवू या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांचे संचालक, तज्ज्ञ डॉक्टर्स यांना केले.
कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व नामांकीत खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी आणि तज्ज्ञांनी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे,सचिव आबासाहेब जऱ्हाड, मुंबई महापालिकेचे आयुक्त आय.एस. चहल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, धर्मदाय आयुक्त चौरे, टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडीत उपस्थित होते.
आता कोरोनाने अक्राळविक्राळ रूप धारण केलयं
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, गेल्या वर्षभरापूर्वी कोरोनाशी युद्ध पुकारले ते सुरूच आहे. प्रत्यक्ष युद्ध लढणाऱ्या सैनिकांप्रमाणे आपण सारे दिवस रात्रं रुग्णसेवा करीत आहात. मधल्या काळात रुग्णसंख्या नियंत्रणात येत असताना शिथिलता आली आणि कोरोनाने अक्राळविक्राळ रूप धारण करून हल्ला चढवला आहे. त्यामुळे आताची परिस्थिती वेगळी आहे, असे त्यांनी सांगितले.
जम्बो कोविड सेंटर्स खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावे
कोरोनाच्या या कठीण काळात खासगी रुग्णालयांनी आपल्या सुविधा वाढवून रुग्णांना दिलासा द्यावा. शासनाने जम्बो कोविड सेंटर्स उभारले आहेत त्यातील काही खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावे, असे आवाहन करतानाच या सेंटर मध्ये खासगी रुग्णालयातील डॉक्टरांचा राऊंड झाल्यास उपचारात मदत होईल आणि लोकांच्या मनात या सेंटर्संविषयी असलेली भावना दूर करण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्र एकवटल्यावर तो जिंकतो. ही एकजूट सर्व थरांमध्ये आणतांनाच कोरोनाला हरवायचय आणि यातील तुम्ही महत्वाचा दुवा आहात असे मुख्यमंत्र्यांनी खासगी रुग्णालयाच्या प्रतिनिधींना सांगितले.
प्रत्येक जिल्ह्यात डॅशबोर्ड झाला पाहिजे
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, कोरोनाच्या उपचारात खासगी रुग्णालयांचे योगदान मोठे आहे. आताच्या परिस्थितीत मिशन मोडवर काम करण्याची गरज आहे. राज्य शासनाने खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेतल्या आहेत त्याचप्रमाणे अतिरीक्त बेडची सुविधाही निर्माण करावी. जिल्हा रुग्णालयात खाटांची संख्या वाढवितानाच प्रत्येक जिल्ह्यात डॅशबोर्ड झाला पाहिजे आणि त्यामाध्यमातून बेडची उपलब्धता दिसली पाहिजे. खासगी रुग्णालयांनी रेमडीसीवीरचा वापर जपून करावा. लक्षणे नसलेल्या रुग्णांना ते देऊ नये, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. राज्य शासनाने चाचण्यांवर, उपचारांच्या दरांवर नियंत्रण आणले आहे त्याचे पालन होणे गरजेचे आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या उपचाराचा खर्च वाढणार नाही याची दक्षती खासगी रुग्णालयांनी घ्यावी. छोट्या शहरांसाठी ई आयसीयू उपयुक्त ठरणार असून त्याचा वापर वाढविण्याची गरज असल्याचे टोपे यांनी सांगितले.
सेवानिवृत्त डॉक्टर्स, नना काही काळासाठी पुन्हा सेवेत घ्यावे – अमित देशमुखर्स
वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख म्हणाले की उपचाराच्या सुविधा वाढविताना मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी जे डॉक्टर्स, नर्स निवृत्त झाले आहेत त्यांना पुढील तीन किंवा सहा महिन्यांसाठी सेवेत सामावून घेण्याविषयी प्रयत्न करावेत त्यामुळे अनुभवी मनुष्यबळ उपलब्ध होईल. खासगी रुग्णालयांनी याकाळात आयसीयू बेड, ऑक्सिजन बेड यांचा विस्तार करावा. राज्यात २० ते २५ वैद्यकीय महाविद्यालयांची रुग्णालये आहेत जेथे शक्य असेल तेथे तातडीने व्हेंटीलेटर्स, ऑक्सिजन बेड विस्ताराचे काम हाती घेण्याच्या सूचनाही देशमुख यांनी यावेळी केल्या.
याक्षेत्रातील तज्ज्ञांनी दुसरी लाट आणखी किती काळ राहील याचा अभ्यास करावा जेणेकरून उपाययोजना करण्यामध्ये त्याचा उपयोग होईल. छोट्या जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांचे दर देखील नियंत्रणात असले पाहिजे. महानगरातील आणि छोट्या जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातील दर भिन्न असले पाहिजे, असा मुद्दा श्री. देशमुख यांनी मांडला. टास्कफोर्सचा जो उपचाराचा प्रोटोकॉल आहे तो खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी अंमलात आणावा जेणेकरून औषधांची टंचाई जाणवणार नाही.
यावेळी डॉ. व्यास, चहल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या गीता कोप्पीकर, अश्विनी हॉस्पिटलचे डॉ. राजेंद्र, पुण्याच्या रुबी हॉल क्लिनीकचे डॉ. पी. के. ग्रांट, नागपुरच्या केअर हॉस्पिटलचे डॉ. रवि मनाडे, औरंगाबादच्या एमजीएम हॉस्पिटलचे डॉ. प्रवीण सुर्यवंशी, ठाण्याचे डॉ. संतोष कदम, डॉ. बिचू, डॉ. गौतम भन्साळी, डॉ. हिमांशू गुप्ता, निर्मल जैस्वाल, डॉ. सुजित चटर्जी, राजन बोरकर, डॉ. हृषीकेश वैद्य, अविनाश सुपे, डॉ. रविंद्र मोहन, महेश नार्वेकर, संतोष घाग, अमित सोमानी, निर्मल तापरिया, भाटिया रुग्णालय, नानावटी, कमल नयन बजाज, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.