मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्क फोर्ससमवेत बैठक..

राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन उपलब्धता, वैद्यकीय सुविधा तातडीने वाढविण्यावर कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्क फोर्ससमवेत बैठक सर्वसमावेशक एसओपी तयार करणार

मुंबई प्रतिनिधी : कोविडच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुविधा वाढवणे, रेमडीसीव्हीर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तत्काळ कार्यवाही व्हावी असे सांगताना लसीकरण वाढविण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा, अशी विनंती परत एकदा आपण प्रधानमंत्र्यांना करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

         मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या टास्क फोर्ससमवेत ऑनलाईन बैठक घेतली. यात ऑक्सिजन उपलब्धता, रेमडीसीव्हीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढविणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे आदी मुद्यांवर विस्तृत चर्चा झाली.  यात आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी. डॉ. अविनाश सुपे, डॉ. उडवाडिया, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. राहुल पंडित, डॉ. झहीर विराणी, डॉ. ओम श्रीवास्तव, डॉ. तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव श्री. सौरव उपस्थित होते.

एसओपी तयार करणे सुरू  

     मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून आपण कोविड्शी लढा देताना सुविधा वाढविल्या, चाचण्या वाढवल्या, मोठ्या प्रमाणावर आरोग्याचे नियम पाळावेत यादृष्टीने जनजागृती केली, लोकांमध्ये सुद्धा याविषयी जागरूकता आली आहे.  कार्यालयीन वेळांमध्ये बदल करावेत, वर्क फ्रॉम होमवर भर द्यावा, मुंबईत उपनगरीय रेल्वेसाठी पिक अवर्स ठरवणे अशा अनेक मुद्द्यांवर आपण बोललो आणि कार्यवाही केली आहे. मुळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्ती लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरवित आहेत. जे लोक आरोग्याचे नियम पाळत आहेत त्यांना निष्काळजी लोकांमुळे कारण नसतांना धोका निर्माण झाला असून लॉकडाऊन लावून ही वाढ थोपवावी असे त्यांचे म्हणणे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात सर्वसमावेशक कार्य पद्धती ( एसओपी ) तयार करण्यात येईल.

      आता आपण लसीकरणात पुढे आहोत मात्र आणखीही गती वाढवू आणि जास्तीत जास्त जणांना लस देऊत पण हे लसीकरण आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी उपयुक्त ठरेल, आत्ता या क्षणी असलेल्या लाटेला थांबविण्यासाठी आपल्याला कडक निर्बंध काही काळासाठी का होईना लावावेच लागतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

रेमडीसीव्हीरचा अवाजवी वापर थांबिण्यावर चर्चा     

           आजच्या बैठकीत गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश तसेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो तेथून ऑक्सिजन तातडीने मागविण्याची कार्यवाही करावी यावरही चर्चा झाली.  रेमडीसीव्हीरचा अति व अवाजवी वापर थांबविणे देखील गरजेचे आहे असे मत टास्क फोर्सने व्यक्त केले.यावेळी आरोग्यमंत्री डॉ. टोपे यांनी देखील बोलताना आपण रेमडीसीव्हीरचा पुरवठा किरकोळ विक्रेत्यांकडून न होता तो ठोक विक्रेत्याने थेट रुग्णालयास देणे,  रेमडीसीव्हीरसंदर्भात डॉक्टरकडून फॉर्म भरून घेणे, केंद्र सरकारच्या समन्वयाने पुरवठा वाढविणे यावर कार्यवाही झाली आहे, अशी माहिती दिली.  

टास्क फोर्सने दिल्या सूचना  

         ९५ टक्के रुग्ण हे घरीच योग्य रीतीने उपचार घेऊन बरे होऊ शकतात, केवळ गंभीर स्वरूपाच्या रुग्णांनाच तातडीने रुग्णालयाची गरज भासते. त्यादृष्टीने जनजागृती करावी, सोसायट्यांमध्ये विलगीकरण कक्ष करून तिथे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स लावून तात्पुरती गरज भागवावी, मुंबई पालिकेसारखी वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून बेड्सचे उत्तम व्यवस्थापन करावे, डॉक्टरांनी आलेल्या रुग्णाला ६ मिनिटे वॉक टेस्ट करून घ्यावी मगच निर्णय घ्यावेत, तरुण रुग्णांना देखील व्हेंटीलेटर्सची आवश्यकता पडू लागली आहे त्याचे नियोजन करावे. ऑक्सिजन देताना तो सुयोग्य आणि आवश्यकतेपेक्षा जास्त न दिला पाहिजे यासाठी डॉक्टर्सना सूचना देणे, मास्क न लावल्यास किंवा इतर नियम तोडल्यास मोठा दंड आकारणे एमबीबीएसच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्याचा, आयुष डॉक्टर्सचा  मोठ्या प्रमाणावर  उपयोग करून घेणे आदि सूचना करण्यात आल्या.

ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न

    प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले की, सध्या १२०० मेट्रिक टन पैकी ९८० मेट्रिक टन ऑक्सिजन वैद्यकीय कारणांसाठी वापरला जात असून पुढच्या काही दिवसांत ही क्षमता पूर्ण होईल. केंद्र सरकारच्या समन्वयाने इतर राज्यांशी बोलून तसेच देशपातळीवरील वाहतूकदरांशी चर्चा करून ऑक्सिजन वाहतूक कशी करता येईल त्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.

        डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, ४ एप्रिल ते १० एप्रिल असे एका आठवड्यात ४ लाख नवीन रुग्ण राज्यात आढळले. तर १९८२ मृत्यू झाले.  सध्या मृत्यू दर ०.५ टक्के इतका असून तो वाढतोय. गेल्या महिन्यात १४ मार्च ते २० मार्च या आठवड्यात १.५ लाख रुग्ण होते. सध्या पॉझिटीव्हिटी दर २६ टक्के असून जितक्या जास्त चाचण्या करतो आहोत तितका हा दर वाढतो आहे. काल रोजी आपण २ लाख ६० हजार चाचण्या केल्या. यात १ लाख एन्टीजेन चाचण्या होत्या. सध्या २० हजार २५० आयसीयू बेड्स पैकी ७५ टक्के भरले असून ६७ हजार ऑक्सिजन बेड्स पैकी ४० टक्के भरले आहेत. जवळपास ११ ते १२ जिल्ह्यात बेड्स उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती आहे. नंदुरबार येथे रेल्वेला विनंती करून रेल्वे बोगीत आयसोलेशन बेड्स व्यवस्था केली आहे असेही ते म्हणाले.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८