दहिसर, बीकेसी, मुलूंड जंबो कोविड सेंटर मिळून एकूण ५८० रुग्णांचे रात्रीच करणार स्थलांतर
अतिरिक्त आयुक्त काकाणी यावेळी म्हणाले की, तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत ताशी सुमारे ६० ते ८० किलोमीटर वेगाने वादळीवारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून सोबत जोरदार पाऊसही कोसळू शकतो. चक्रीवादळाचा मुंबई महानगराला थेट धोका नसला तरी मुंबई किनाऱयाला लागून ते जात असल्याने, वादळीवारे व मुसळधार पावसाची शक्यता पाहता, खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोविड रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर केले जात आहे. प्रामुख्याने तीन भव्य (जंबो) कोविड आरोग्य केंद्रांतील मिळून ५८० रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये आज रात्रीच सुरक्षितपणे स्थलांतरित करण्याची कार्यवाही सुरु करावयाची आहे. यामध्ये दहिसर कोविड केंद्रातील १८३, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) कोविड केंद्रातील २४३ आणि मुलूंड कोविड केंद्रातील १५४ रुग्णांचा समावेश आहे. यात अतिदक्षता उपचार, प्राणवायू पुरवठा या वर्गवारीप्रमाणे स्थलांतर करताना प्राणवायू पुरवणारे सिलेंडर्स, सुसज्ज रुग्णवाहिका, आवश्यकता भासल्यास इंजेक्शन व इतर संयंत्रांसह रुग्णांना सुरक्षितपणे स्थलांतरित करण्याचे निर्देश काकाणी यांनी यावेळी दिले.कोणता रुग्ण कोणत्या रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आला, त्यासाठी रुग्णवाहिका व इतर आवश्यक वैद्यकीय संयंत्रे व सामुग्री उपलब्ध आहे का, यासह विविध तपशिलवार कार्यवाही करण्यासाठी रुग्णालय निहाय समन्वय अधिकारी तात्काळ नेमण्याचे निर्देशही काकाणी यांनी तिनही कोविड केंद्रांना दिले.
रुग्ण स्थलांतरित करण्यात आल्यानंतर त्याबाबतची माहिती त्यांच्या नातेवाईकांना कळवावी, ज्या रुग्णालयात प्रत्यक्ष स्थलांतर केले आहे, तिथे आवश्यक ती सर्व व्यवस्था उपलब्ध आहे, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, तसेच प्रत्यक्ष स्थलांतर सुरु करताना वाहतूक पोलिसांसमवेत आवश्यक तो समन्वय साधावा, अशी सूचनाही काकाणी यांनी केली.