निसर्गाने ठरवलेल्या लक्ष्मणरेषा ओलांडू नये.

निसर्गाची जपणूक करून विकास कामे करण्याबाबत

तांत्रिक सल्ला देणारी संस्था स्थापन करावी  - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वन विभागाच्या वेबिनारचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते “चळवळ जैवविविधता संवर्धनाची, वाटचाल जैवविविधता मंडळाची” या माहितीपटाचे अनावरण.

मुंबई प्रतिनिधी : विकास कामे करतांना ती कामे निसर्गाची जपणूक करून कशी केली जावीत हे सांगणारी, यासाठीचा तांत्रिक आणि शास्त्रीय सल्ला देणारी,  जिचा सल्ला बंधनकारक असला पाहिजे, अशी संस्था महाराष्ट्रात स्थापन करावी, यासाठी महाराष्ट्राने देशात सर्वात आधी पुढाकार घ्यावा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आपण निसर्ग समाधानाचे भाग आहोत  हे या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाचे बोधवाक्य असल्याचे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने वन विभागाने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते.

संजीवनी जपली पाहिजे

रामायणात लक्ष्मणाला वाचवण्यासाठी संजीवनी वनस्पती आणावी लागली. संजीवनी म्हणजे काय तर आपल्यासोबत जगणारी आणि आपल्याला जगवणारी जी गोष्ट आहे ती संजीवनी, आपण ती जपली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.आपण विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास करत चाललो आहोत असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, त्यामुळेच जंगलाचा ऱ्हास करून विकास कामांचे प्रस्ताव जेंव्हा आपल्यासमोर येतात तेंव्हा त्याला आपला विरोध असतो. याचा अर्थ आपला विकासाला विरोध आहे असं नाही तर निसर्गस्नेही विकासाची संकल्पना आपल्याला मान्य आहे असे ते म्हणाले.मानव वस्तीवर वन्यजीवांनी कधी अतिक्रमण केल्याचे पाहिले आहे का? त्यांनी एखादी बिल्डिंग रिकामी करून, पाडून तिथे राहण्यास सुरुवात केली असं ऐकलं आहे का? नाही, पण माणूस मात्र वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर अतिक्रमण करत असल्याचे दिसते असे सांगून ते म्हणाले की, गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ आले, यावर्षी तौक्ते चक्रीवादळ आले. चक्रीवादळ आले की, आपण हवामान बदलाचे कारण सांगतो. पण हवामान बदल होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत याचा आपण गांभीर्याने विचार करणार आहोत का, असेही ते म्हणाले.

जैवविविधतेविषयी जनजागृती व लोकसहभागाची गरज

    जैवविविधतेत नष्ट होणाऱ्या प्राण्यांची आणि वनस्पतींची नोंद घेणे एवढेच काम या क्षेत्रात होऊ नये, तर मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. लोकसहभाग वाढवून त्याच्या रक्षणाचे काम व्हावे असे मुख्यमंत्री म्हणाले.

नवोदित संशोधकांना प्रोत्साहन देण्याची गरज

      आजच्या युवा पिढीमध्ये निसर्ग, जैवविविधता याविषयी प्रचंड रस आहे ते या क्षेत्रात अभ्यास करून, संशोधन करून पुढे जाऊ इच्छितात. अशा सर्व युवकांना सहकार्य आणि पाठिंबा देण्याची गरज आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शहरात जैवविविधता असलेले मुंबई हे कदाचित एकमेव महानगर

        आरेचे जंगल आपण वाचवले. शहरात जंगल आणि या जंगलामध्ये प्रचंड जैवविविधता असलेले आरेचे क्षेत्र आपण जपले. जगात अशाप्रकारे शहरात जैवविविधता असलेले मुंबई हे कदाचित एकमेव महानगर असेल असेही ते म्हणाले.

लक्ष्मणरेषा ओलांडू नये

     निसर्ग अजूनही आपल्याकडे मातृत्वाच्या भावनेने पहातो आणि आपल्याला जपतो आहे. पण लक्ष्मण रेषा ओलांडली की, काय होते हे कोरोना विषाणूने दाखवून दिले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सुयोग्य वर्तन हवे

        निसर्गासोबत जगण्यासाठी सुयोग्य वर्तन ( ॲप्रोपियेट बिहेविअर) विकसित करायला हवे. असे झाले तरच "आरोग्यदायी विकास" होईल असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ.शेषराव पाटील यांनी जैवविविधता मंडळाच्या कामाची माहिती दिली. पर्यावरण रक्षण आणि संवर्धनातून विकासाची संकल्पना पुढे नेल्यास हा विकास शाश्वत ठरेल आणि मानवास कल्याणकारी ठरेल असेही ते यावेळी म्हणाले. प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी सुंदरलाल बहुगुणा यांच्या कार्याचे स्मरण करत महाराष्ट्राची संपन्न अशी जैवविविधता, इथल्या प्रादेशिक रानभाज्या यांचा आवर्जून उल्लेख केला. राज्यात 28 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये जैवविविधता नोंदींचे काम केले जात असून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात वन विभागाने अनेक महत्वाकांक्षी निर्णय घेतल्याचे सांगताना त्यांनी राज्यात घोषित करण्यात आलेले नवीन अभयारण्ये, जैव विविधता वारसा स्थळे, नव्याने घोषित करण्यात आलेले संवर्धन राखीव याची माहिती दिली.

  केंद्रीय जैवविविधता प्राधिकरणाचे विशेष तांत्रिक सल्लागार अचलेंद्र रेड्डी यांनी महाराष्ट्राला ईश्वराचा आशीर्वाद लाभला असून महाराष्ट्र हे जैवविविधतेने समृद्ध राज्य असल्याचे सांगितले. त्यांनी महाराष्ट्र जैवविविधता मंडळाच्या कामाचा गौरव केला. विकास प्रक्रियेत जैवविविधता आणि निसर्गाकडे दुर्लक्ष केल्याची फळे आता आपण भोगू लागल्याचेही ते म्हणाले. त्यांनी आपल्या भाषणात देशभर प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरच्या गुळाचा आणि अहमदनगर येथील राहीबाई पोपरे यांच्या बीज बँकेचा आवर्जून उल्लेख केला. ज्या औषधी वनस्पतींना आंतरराष्ट्रीय बाजारात किलोला काही हजार रुपयांचा भाव मिळतो, त्या वनस्पती मात्र आदिवासी बांधवांकडून घेतांना त्यांना किलोला तीस ते चाळीस रुपयांचा भाव मिळतो. या गोष्टीकडे लक्ष वेधले व ज्या कंपन्या आदिवासी बांधवांकडून या वनस्पती विकत घेतात त्या कंपन्याना मिळणाऱ्या लाभांशातली काही रक्कम ही आदिवासी बांधवांना मिळेल याकडे लक्ष देण्याची गरज ही त्यांनी व्यक्त केली.

निसर्ग ऋषी सुंदरलाल बहुगणा यांना वेबिनारमधील उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली.        

 यावेळी जैवविविधता मंडळाने तयार केलेल्या माहितीपटाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमात प्रवीण श्रीवास्तव यांनी प्रास्ताविक केले. 

     या ऑनलाईन वेबिनारमध्ये जैव विविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेषराव हिम्मतराव पाटील, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा जैव विविधता मंडळाचे  सदस्य सचिव प्रवीण श्रीवास्तव यांच्यासह  राज्यभरातील  वनाधिकारी सहभागी झाले होते.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८