सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालयासाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर करा

सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालयासाठी स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालयचा प्रस्ताव सादर करा -वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई प्रतिनिधी : मुंबईतील सेंट जॉर्ज आणि गोकुळदास तेजपाल (जीटी) या दोन रुग्णालयांसाठी स्वतंत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नव्याने सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले.वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयाला भेट देऊन या  रुग्णालयात कोविड रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचाराबद्दल माहिती घेतली त्यावेळी ते बोलत होते.  वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ. चंदनवाले, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. माणकेश्वर, सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.आकाश खोब्रागडे आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालया सोबतच नवीन नर्सिंग कॉलेजचा प्रस्तावही सादर करण्यात यावा असे सांगून अमित देशमुख यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयात सध्या कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येतो हे लक्षात घेता या रुग्णालयासाठी स्वतंत्र ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यात यावा, कोविड रुग्णावर उपचार करण्यासाठी अधिका-अधिक  खाटांची संख्या वाढविण्यात यावी,  रुग्णालयातील सर्व रिक्त पदे भरण्याबाबत तातडीने कारवाई करण्यात यावी  आणि  सेंट जॉर्ज रुग्णालयात कोविड लसीकरण केंद्रही तातडीने सुरू करण्यात यावे असे निर्देश  देशमुख यांनी दिले.

    सेंट जॉर्ज रुग्णालयाचे रूपांतर सध्या कोविड रुग्णालयात करण्यात आले असून  क्रिटिकल केअर युनिट म्हणून हे रुग्णालय उपचारासाठी राखून ठेवण्यात आले आहे. असे असले तरीही या रुग्णालयातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे राष्ट्रीय स्तरावरील बरे होणाऱ्या रुग्णांच्या सरासरी पेक्षा कमी असू नये याची दक्षता घेण्यात यावी असेही  देशमुख यांनी यावेळी सांगितले.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८