पोलीसांच्या कार्यक्षमता आणि मनोबलवृद्धीसाठी राज्यात विभागवार पोलीस प्रशिक्षण केंद्रे सुरु करावीत
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पोलीसांच्या अपेक्षा प्रत्यक्षात उतरवणारे सरकार
मुख्यमंत्री यावेळी बोलतांना म्हणाले की, नागरिकांच्या घराचे आणि जीवाचे रक्षण पोलीस करतात पण त्यांच्याच घरांचे संरक्षण होणार नसेल तर त्याचा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होणे अत्यंत स्वाभाविक आहे, हे दुष्परिणाम टाळण्यासाठी उत्तम दर्जाच्या आणि आधुनिक रंगसंगतीच्या पोलीस वसाहती निर्माण होणे आवश्यक आहे. पोलीसदलाच्या भावना आणि अडचणींशी मी सहमत आहे. त्यांच्या अपेक्षा प्रत्यक्षात उतरवणारे हे सरकार आहे. पोलीस स्टेशन शेजारीच पोलीस वसाहत इमारत असणे गरजेचे असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, त्यामुळे पोलीसांच्या वेळेची आणि श्रमाची बचत होऊन कामाचा दर्जा उत्तम राहण्यास मदत होणार आहे. मल्हारपेठ पोलीस स्टेशनच्या माध्यमातून गुन्हेगारांना जरब बसावी तर गोरगरीबांना आधार मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लोकांना पोलीस स्टेशनला येण्याची गरजच पडू नये इतकी इथली कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राहावी असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या बाळासाहेब देसाई आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांमधील ऋणानुबंधाचे आणि त्या दोघांमध्ये परस्परांविषयी असलेल्या आदराचे ही स्मरण केले.
पोलीस वसाहती आणि पोलीस स्टेशनची कामे दर्जेदार व्हावीत- उपमुख्यमंत्री अजित पवार
मल्हारपेठ पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहतीसाठी जनतेला शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहतींच्या ज्या कामाचे भुमीपुजन केले जाते त्या कामाचा दर्जा उत्तम राहावा आणि ती दिलेल्या वेळेत काम पूर्ण व्हावीत. १९९५ पासूनची मागणी या सरकारच्या काळात आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पूर्ण होत आहे ही नियतीचा भाग असल्याचेही ते यावेळी म्हणाले. इमारत ही उत्तम रंगसंगतीची असावी. कामात सातत्य असावे अशी अपेक्षा व्यक्त करतांना त्यांनी पोलीस गृहनिर्माण कामासाठी निधीची कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली. मल्हारपेठ पंचक्रोशीतील मोठी बाजारपेठ असून येथे वाहतूक ही मोठ्याप्रमाणात आहे. येथील वाढत्या लोकसंख्येला कायदा व सुव्यवस्था उपलब्ध करून देतांना गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यास या पोलीस स्टेशनमुळे मदत होईल. सातारा पोलीस दलाने कोरोना काळात खुप चांगले काम केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी पोलीस दलाचे अभिनंदन केले. कायद्याच्या रक्षण करणाऱ्या पोलीस दलाची माणुसकी यावेळी पहायला मिळाली. कोरोना बाधित झालेले पोलीस बरे झाले की लगेच ड्युटीवर हजर झाले. त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना या कर्तव्यनिष्ठेसाठी धन्यवाद देतो. पोलीस बांधवांनीही कोरोना काळात सवत:ची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. पोलीसदलातील कोविड योद्ध्यांना ५० लाखाचे विमा कवच देण्यात आल्याची माहिती ही त्यांनी दिली. वरिष्ठांनी कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अडचणी संवदेनशीलपणे पहाव्यात असे आवाहन करतांना उपमुख्यमंत्र्यांनी पोलीस दलात १२५०० कर्मचाऱ्यांची नवीन भरती करत असल्याची माहिती ही दिली. राज्यात पोलीस वसाहती चांगल्या नाहीत याची जाणीव आपल्याला असून हे सरकार त्यांना उत्तम निवास व्यवस्था देण्यासाठी निश्चितीपणे काम करील असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी दिला. स्मार्ट पोलिसींगची संकल्पना राज्यभर उत्तमपणे राबवल्यास पोलीस दलाची कार्यक्षमता वाढून कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.
पोलीस बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे- बाळासाहेब पाटील
दुर्गम तालुक्यात मल्हारपेठला वेगळे महत्व आहे. ही मोठी बाजारपेठ असल्याने येथे स्वतंत्र पोलीस स्टेशनची गरज होती. कोरोनामुळे राज्यातील जनतेचे आरोग्य जपण्याला शासनाचे प्राधान्य राहिले. कोविडमुळे राज्याच्या पोलीस यंत्रणेवर मोठा ताण आला. अनेकजण बाधित झाले तर काहीजण दुर्देवाने आपल्याला सोडून गेले. राज्याच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असलेल्या पोलीस बांधवांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे असून त्यांना चांगले घर देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. गुन्हे कमी करण्यासाठीही या पोलीस स्टेशनचा उपयोग होईल. निश्चित केलेल्या १८ महिन्याच्या काळात या पोलीस वसाहतीची इमारत उभी रहावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पोलीस गृहनिर्माण हा शासनाच्या प्राधान्यक्रमाचा विषय- सतेज पाटील
मल्हारपेठ पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहतीच्या माध्यमातून १९९५ पासून पाहिलेले स्वप्नं आज पूर्ण होत आहे. राज्याच्या प्रगतीमध्ये पोलीसांचा सिंहाचा वाटा असून उत्तम कायदा व सुव्यवस्था राखत राज्याचा नावलौकीक पोलीस दलाने नेहमीच वाढता ठेवला आहे असतो पोलीसांच्या घराचा विषय हा विषय शासनाच्या प्राधान्यक्रमावर आहे. ही इमारत लवकरात लवकर पूर्ण व्हावी.
पोलीस वसाहतीचे काम वेळेत पूर्ण करू- राज्यमंत्री शंभुराजे देसाई
मल्हारपेठ सारख्या दुर्गम डोंगरी भागात हा २० कोटी रुपयांचा प्रकल्प उभा राहात आहे. या भागात पोलीस स्टेशन उभे राहणे ही काळाची गरज होती. पोलीसांच्या घरांची परिस्थिती बिकट आहे त्यांना चांगले घर मिळावे यासाठी गृह विभागाने आराखडा तयार करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी मला पद स्वीकारतांना दिले होते. उपमुख्यमंत्र्यांनीही अर्थसंकल्पातून ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक ची रक्कम पोलीस गृहनिर्माणला दिली. त्यांनाही धन्यवाद ग्रामीण आणि डोंगरी भागातील हा प्रकल्प वेळेत पूर्ण करू अशी ग्वाही देतो. पोलीसांना उत्तम दर्जाचे घर देण्याचा विभागाचा प्रयत्न राहील. पोलीस प्रशिक्षणाचे एक केंद्र कोयनानगरला व्हावे ही गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. सातारा सांगली कोल्हापूरसाठी एस.डीआर एफचे स्वतंत्र युनिट द्यावे व त्याला जोडून हे प्रशिक्षण केंद्र द्यावे तसा प्रस्ताव तयार केला आहे त्यास मान्यता द्यावी
मल्हारपेठ पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहतीची वैशिष्ट्ये
मल्हारपेठ हे जिल्ह्यातील ३० वे पोलीस स्टेशन. या स्टेशनमध्ये ३० कर्मचारी कार्यरत राहणार. या पोलीस स्टेशनअंतर्गत ७० गावे समाविष्ट. १ लाखाहून अधिक लोकांना लाभ. पाटण पोलीस ठाण्यापासून मल्हारपेठ १८ कि.मी अंतरावर असून मल्हारपेठ मोठी बाजारपेठ असून सहकारी कारखाने आणि इतर महत्वाच्या बाबींमुळे हे ठिकाण महत्वाचे आहे. या भागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत होईल.मल्हारपेठ पेठ पोलीस वसाहतीत ६० घरे (५६ कर्मचारी ४ अधिकाऱ्यांचे निवासस्थान)