कर्करोग म्हणजे काय ?

संपादकीय, 'कर्करोग' हा शब्द ऐकताच रुग्णाची पाचावर धारण बसते. इतकी भयंकर स्थिती असण्याचे कारण काय? कर्करोग झालेला माणूस जास्त दिवस जिवंत राहत नाही हेच या भीतीचे कारण असते. या कर्करोगाला इतके घाबरायची खरंच गरज आहे का, ते आता पाहू.सामान्यपणे कर्करोग हा वयस्कर व्यक्तींचा रोग आहे. आपल्या देशात दर हजार लोकसंख्येत एक व्यक्ती कर्करोगग्रस्त आहे. म्हणजेच प्रत्येक खेडेगावात एकतरी रुग्ण सापडेलच. पुरुषामध्ये जीभ, तोंड, घसा, स्वरयंत्र, अन्ननलिका व जठर, प्रोस्टेट ग्रंथी, गुदाशय व मोठे आतडे, श्वसनसंस्था व फुफ्फुसे तसेच यकृत या भागांचे कर्करोग प्रामुख्याने होतात. स्त्रियांमध्ये गर्भाशयाचे तोंड, स्तन, अन्ननलिका व जठर, स्त्रीबीजांड, तोंडाचा अंतर्भाग, जीभ, गुदाशय, तसेच फुफ्फुसे व श्वसनसंस्था यांचे कर्करोग होतात. भारतातील कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी ५०% रुग्ण तोंडाचा अंतर्भाग, घसा व गर्भाशयाचे तोंड या भागांशी संबंधित असतात.

   शरीरातील पेशींची संख्या नेहमी वाढत असते, पण त्यावर नियंत्रण असते. त्यामुळे त्या वाढीचे दुष्परिणाम होत नाहीत. तसेच जठरात फुप्फुसाच्या पेशी वाढत नाहीत, तर यकृतात हाडांच्या पेशी वाढत नाहीत. कर्करोगात पेशींची अनियंत्रित अशी वाढ होते व लिंफ वाहिनीतून वा रक्तवाहिनीतून या पेशी इतर इंद्रियापर्यंत पोहोचून तेथे रुजतात व वाढायला लागतात. वाढ खूप झाल्यास इंद्रियाभोवतीच्या रक्तवाहिन्या, दुसरे अवयव यांच्यावरही त्या आक्रमण करतात व त्यांना हानी पोहोचते. कर्करोग होण्याची अनेक कारणे आहेत. काही रासायनिक पदार्थाशी संबंध येणे, किरणोत्सर्गी पदार्थांशी संबंध येणे, एखाद्या जागी सतत घर्षण होणे, काही विषाणूंचा संसर्ग होणे, अनुवंशिकता व व्यसने ही कर्करोगाची प्रमुख कारणे होत. कर्करोग झाला आहे, हे ओळखण्यासाठी काही लक्षणे उपयुक्त ठरतात. या वजन अचानक खूप कमी होणे, भूक न लागणे, शरीरात कोठेही अचानक गाठ येणे वा न बरा होणारा व्रण तयार होणे, उतारवयात मासिक पाळी थांबल्यानंतर अचानक जास्त रक्तस्त्राव होणे, स्तनामध्ये गाठ वा व्रण होणे, आवाज बदलणे वा बसणे, शौचविसर्जनाच्या सवयीत बदल होणे तसेच लघवी, शौचमार्ग व नाक, तोंड, कान यांतून अचानक रक्तस्त्राव होणे इत्यादींचा समावेश होतो.

      कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास रुग्ण वाचू शकतो. मुख्य म्हणजे त्याचे आयुष्य वाढते. कर्करोग असेल म्हणून घावरून काही लोक डॉक्टरांना दाखवतच नाहीत. हे बरोबर नाही. काही कर्करोग शस्त्रक्रियेने, तर काही किरणोपचाराने व औषधांनी बरे होतात. निदान व्यक्तीचा मृत्यू टाळता येतो व त्याचे आयुष्य वाढवता येते. फक्त निदान लवकर व्हायला हवे.  संकलन व संकल्पना : डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८