धारावी मध्ये मोबाईल टॅबचे विद्यार्थ्यांना वाटप

ऑनलाइन शिक्षणपद्धतीत कोणीही वंचित राहू नये यासाठी प्रयत्नशील  -पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

धारावीतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी टॅबचे वितरण

मुंबई प्रतिनिधी : कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत. तथापि विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क अबाधित राखण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षण पद्धती गरजेची असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. याच जाणिवेतून ऑनलाइन शिक्षण पद्धतीत कोणीही वंचित राहू नये, यासाठी धारावी काळा किल्ला मनपा शाळेतील 500 विद्यार्थ्यांना  ठाकरे यांच्या हस्ते शैक्षणिक टॅबचे वितरण करण्यात आले. यावेळी खासदार राहुल शेवाळे, नगरसेवक वसंत नकाशे, महापालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, शिक्षणाधिकारी राजू तडवी, आयएएचव्हीच्या प्रमुख मीरा गुप्ता उपस्थित होत्या. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हॅल्यूज (आयएएचव्ही) संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला.

   ठाकरे म्हणाले, कोविडची परिस्थिती किती दिवस चालेल माहीत नाही. पण त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये. यापूर्वी मनपा इतर शाळेत शिकण्यासाठी टॅब दिले होते, परंतु आता ऑनलाइन शिक्षणासाठी टॅब देण्यात येत आहेत. हा बदल लक्षात घेता विद्यार्थ्यांसाठी नवनवीन शिक्षण पद्धतीचा अवलंब गरजेचा असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व विद्यार्थ्यांनी मास्क व्यवस्थित लावले होते, त्यांच्या या जाणिवेचे ठाकरे यांनी आवर्जून कौतुक केले.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८