पथकरातून सूट मिळण्यासाठीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी -सभापती रामराजे नाईक-निंबाळकर
विद्यमान आमदार, अतिमहत्वाच्या व्यक्ती, लोकसभा व राज्यसभा सदस्य, केंद्र व राज्यशासनाची वाहने याचबरोबर विधानसभा व विधानपरिषद सदस्य यांना पथकर शुल्क आकारणीमध्ये सूट देण्यात येते. मात्र, फास्टॅग लागू झाल्यानंतर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असून, यासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आमदारांना राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरण विभागाने सहकार्य करावे असे सभापती यांनी सांगितले. माजी आमदारांना फास्टॅगद्वारे पथकरात सूट मिळण्यासाठी संबंधितांकडून प्रस्ताव आल्यास, केंद्र शासनास तशी विनंती करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असेही सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले. तसेच विद्यमान तसेच माजी आमदारांसोबत पथकर नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी सौजन्याने वागण्याच्या सूचना संबंधित विभागाने त्यांना देण्यात याव्यात, असेही सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.