मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातील तळजाई टेकडीवर करणार आंदोलन

पुणे प्रतिनिधी : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांची चाहूल लागताच राजकीय पक्ष पुन्हा एकदा शहरात सक्रिय झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मागील काही दिवसांपासून सातत्याने पुणे शहराचा दौरा करत आहेत. मनसैनिकांचा भेटीगाठी घेत त्यांनी जोरात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता थेट पुणे शहरातील तळजाई टेकडीवर आंदोलन करणार आहेत. येत्या २४ ऑक्टोबर रोजी हे आंदोलन होणार आहे. तळजाई टेकडीवर होणाऱ्या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी मनसेकडून हे आंदोलन होणार आहे.

    या आंदोलनाविषयी मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी माहिती दिली आहे. तळजाई टेकडीवर होणारा हा प्रकल्प एक प्रकारे त्या टेकडीवर अतिक्रमण आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करणार आहोत. सकाळी सात वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार असून राज ठाकरे स्वतः या आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मोरे यांनी दिली.दरम्यान शुक्रवारी राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधून विविध मतदार संघाचा आढावा घेतला. आगामी निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने त्यांनी कार्यकर्त्यांना सूचनाही केल्या. आम्ही निवडणुकीची तयारी केली असून भाजप सोबत युती करण्याच्या दृष्टीने कुठलीही चर्चा झाली नाही असे देखील मोरे यांनी स्पष्ट केले. तसेच या वर्षी पुणे शहराचा महापौर मनसेचा ठरवणार आहे असा विश्वासही वसंत मोरे यांनी व्यक्त केला. 

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८