न्युमोनिया नियंत्रणासाठी ‘साँस’ अभियानाचे आयोजन

 न्युमोनिया नियंत्रणासाठी साँस अभियानाचे आयोजन अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांच्या हस्ते उद्घाट

मुंबई प्रतिनिधी : न्युमोनियापासून संरक्षण, प्रतिबंध आणि उपचार यासाठी 'साँस' मोहिमेचे 'जागतिक न्युमोनिया दिनाचे' औचित्य साधून राज्यस्तरीय उद्घाटन सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या हस्ते करण्यात आले.आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. मृदुला फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उद्घाटन दूरदृश्यप्रणालीव्दारे करण्यात आले. डॉ. प्रदीप व्यास यांनी महाराष्ट्रात अर्भक मृत्यु दर १९ वरून १७ वर आल्याबद्दल आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांचे अभिनंदन केले. 'साँस' मोहीम राबविण्याकरिता 'न्युमोनिया नाही तर बालपण सही' या घोषवाक्यासह शुभेच्छा दिल्या.

    यावेळी डॉ .अर्चना पाटील यांनी ‘साँस’ कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रम तसेच राज्य व जिल्हास्तरावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. डॉ. मुदुला फडके यांनी बालकांमधील न्युमोनियाचा आजार कसा होतो, न्युमोनियापासून संरक्षण, प्रतिबंध आणि उपचार यावरील माहिती सांगितली. तसेच गंभीर न्युमोनिया असतानाच्या स्थितीत आशा, ए.एन.एम , सी.एच.ओ यांनी कुठल्या प्रकारची विशेष काळजी घेतली पाहिजे या विषयी मार्गदर्शन केले.बालकांमधील न्युमोनियाविषयी जनजागृती व लोकसहभाग मिळवण्यासाठी 'साँस' मोहिम राज्यभरात १२ नोव्हेंबर २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२२ कालावधीत राबविण्यात येणार आहे. या राज्यस्तरीय उद्घाटनाच्या सोहळ्याप्रसंगी राज्यातील सर्व आरोग्य संस्था रुग्णालये, अधिकारी कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

    सूत्रसंचालन डॉ. रामचंद्र हंकारे यांनी केले. उपसंचालक डॉ.कैलास बाविस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर यांनी संयोजन केले. या कार्यक्रमात दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यभरातील डॉक्टर्स, आरोग्य विभागाचे संबंधित कर्मचारी, अधिकारी, आशा, ए.एन.एम देखील सहभागी झाले होते.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८