विधान परिषद प्रश्नोत्तरे :
मुंबई प्रतिनिधी : नागपूर येथिल कॅन्सर इन्स्टिट्युटच्या बांधकाम कामाच्या प्रक्रियेची लवकरच सुरुवात करणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. देशमुख म्हणाले या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर कोरोनाची पहिली आणि नंतर दुसरी लाट आली. शासनाने कोरोना प्रतिबंधासाठी उपचारांसाठी प्रयत्न सुरु केले. नागपूर येथिल रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून कर्करोग इन्स्टिट्युट उभारण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
नागपूर येथिल या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी लागणारी यंत्रसामुग्री, उपकरणे, आस्थापनेवरील मनुष्यबळ या सर्वांसाठी प्रयत्न केले जातील असेही ते म्हणाले. या विषयावर उपस्थित झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री गिरीश व्यास डॉ.रणजित पाटील अमरनाथ राजूरकर नागोराव गाणार अभिजीत वंजारी आदिंनी सहभाग घेतला.
* संगणक परिचालकांचा ग्रामपंचायतीच्या आकृतीबंधात समावेश करणार -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
संगणक परिचालकांसाठी पद निर्मिती करुन ग्रामपंचायतीच्या कर्मचारी आकृतीबंधामध्ये समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन असून तसे संगणक परिचालक संघटनेला कळविले आहे अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.राज्यातील संगणक परिचालकांना आय टी महामंडळात सामावून घेण्याबाबत सदस्य सुरेश धस यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.
* रुग्णांना रक्त देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रक्तपेढ्यांवर कारवाई -सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे
राज्यातील रक्त पेढ्यांमार्फत दैनंदिन उपलब्ध रक्त साठा हा सातत्याने राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर अपडेट करण्यात येतो. थॅलेसेमिया सिकलसेल रुग्णांना रक्त देतांना टाळाटाळ करणाऱ्या रक्तपेढ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येते. अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.टोपे म्हणाले शासकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या रुग्णालयातील रुग्णांना नि:शुल्क रक्त देण्यास सुरुवात केली आहे. जिथे रक्ताची आवश्यकता असेल तिथे रक्त पोहचविण्यासाठी इंटरलिंक्ड सुविधा उभारण्यात येत आहे. रक्तपेढ्यांच्या आवश्यकतेनुसार वेळोवेळी रक्तदान शिबीरे घेतली जात आहे. राज्यात रक्ताची आवश्यकता पडल्यास पुरेसा साठा उपलब्ध राहिल यासाठी काळजी घेतली जात आहे. असेही त्यांनी सांगितले.या विषयाच्या अनुषंगाने डॉ.रणजित पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
* कोरोना रुग्णांकडून खासगी रुग्णालयांनी घेतलेले अतिरिक्त शुल्क रुग्णांना परत -सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे
कोरोना कालावधीत जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका तसेच राज्यस्तरावरही तक्रार नोंदविण्याची संकेतस्थळाच्या माध्यमातून सोय करण्यात आली होती. या माध्यमातून नॉन एनपॅनेल्ड दवाखान्याच्या सुमारे 63 हजार 889 तक्रारींपैकी 56 हजार 994 इतक्या तक्रारी सोडविण्यात आल्या आणि 35 कोटी 18 लाख 39 हजार रुपये परत करण्यात आले. अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत असलेल्या एनपॅनेल्ड दवाखान्यांच्या 2 हजार 81 तक्रारींपैकी 774 तक्रारी सोडविण्यात आल्या आणि 1 कोटी 20 लाख रुपये परत करण्यात आले असेही टोपे यांनी सांगितले.या विषयाच्या अनुषंगाने सदस्य सदाशिव खोत यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
विधानपरिषद लक्षवेधी :
* मुंबई शहर व उपनगरमध्ये गृहनिर्माण संस्थाच्या पुनर्विकासासाठी म्हाडा सर्वतोपरी प्रयत्नशील -गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
मुंबई शहर व उपनगरमध्ये गृहनिर्माण संस्थाच्या पुनर्विकासासाठी म्हाडा नक्कीच प्रयत्नशील आहे, अशी माहिती विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.सदस्य भाई जगताप यांनी मुंबई शहर व उपनगरमध्ये जवळपास 50 हजार गृहनिर्माण संस्था आहेत तसेच संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास एक लाख गृहनिर्माण संस्था आहेत यांच्या पुर्नविकासाबाबत अनेक समस्या आहेत या शासनाने प्राधान्याने सोडवाव्यात अशी लक्षवेधी विधानपरिषदेत मांडली. सदस्य सर्वश्री डॉ.वजाहत मिर्झा राजेश राठोड जयंत आसगावकर डॉ.सुधीर तांबे प्रसाद लाड यांनी या लक्षवेधीच्या चर्चेत सहभाग घेतला.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील विनियम ३३(७) नुसार मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकर प्राप्त इमारतींचा पुनर्विकास करण्याची तरतूद आहे. या तरतूदीनुसार मुंबई शहरातील व उपनगरातील अस्तित्वातील जीर्ण तसेच असुरक्षित विद्यमान भाडेकरुंच्या ताब्यातील तसेच बिगर उपकर प्राप्त इमारतींची पुनर्बांधणी आणि पुनर्विकास अतिरिक्त चटईक्षेत्र देणे. मुंबई व मुंबई उपनगरातील झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन विकास नियंत्रण व प्रोत्साहन देखील करण्यात येते. सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या इमारतीच्या विकासासाठी वाढीव चटई क्षेत्र उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून नगरविकास विभागाच्या समन्वयातून उचित निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानपरिषदेत सादर केली.
* विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत महापूर नुकसान भरपाईबाबत बैठक घेणार -आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील महापुरामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत काही प्रकरणात विमा कंपन्या टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी लक्षात घेता विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषदेत सांगितले.विधानपरिषद सदस्य अनिकेत तटकरे यांनी महाड शहरातील व्यापाऱ्यांना महापुरामुळे झालेल्या नुकसान भरपाई देण्याबाबत विमा कंपन्याकडून काही प्रकरणात टाळाटाळ होत असल्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली. यावेळी विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड, भाई जगताप यांनीही चर्चेत सहभाग घेतला.
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले विमा कंपन्याकडून न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे ८०० दावे दाखल होते त्यापैकी ५१५ दावे निकाली निघाले आहेत. तर २८५ दावे प्रलंबित आहेत तर फ्युचर जनरल लिमिटेड कंपनीकडे १३ दावे दाखल पैकी १३ ही प्रलंबित आहेत. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कडे २३३ दाखल दाव्यांपैकी १४० दावे निकाली काढण्यात आले आहेत ७० दावे प्रलंबित २० दावे नाकारलेले आहेत तर २ परत घेतलेले दावे आहेत एस.बी.आय जनरल कडे १८ दावे दाखल होते त्यापैकी ११ दावे निकाली काढले आहेत. ७ दावे प्रलंबित आहेत. प्रलंबित दाव्याबाबत विमा कंपन्याना वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. तसेच विमा कंपन्यानी सहकार्य करावे या दृष्टीने लवकरच बैठक घेण्यात येईल. तसेच या विमा कंपन्या जर नुकसान भरपाई देत नसतील तर हे व्यापारी ग्राहक न्यायालयातही दाद मागू शकतात अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
* बोईसर येथील हरवलेल्या विद्यार्थ्यीनीचा तपास गुन्हे शाखेकडे देणार -गृह राज्यमंत्री सतेज पाटील
बोईसर येथील वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यीनीचा शोध मुंबई गुन्हे शाखेकडे देणार आहे.या विद्यार्थिनीचा शोध लवकरात लवकर लागावा यासाठी मुंबई गुन्हे शाखेकडे हे प्रकरण देण्यात येणार आहे अशी माहिती गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी एका लक्षवेधीला उत्तर देताना विधानपरिषदेत दिली.सदस्य डॉ.मनिषा कायंदे यांनी बोईसर येथील एमबीबीएसची विद्यार्थिनी ही परिक्षेसाठी घराबाहेर पडलेली असताना वांद्रे बॅण्ड स्टँडवरुन दिवसाढवळ्या गायब झाल्याचे 29 नोव्हेंबर, 2021 मध्ये उघडकीस आल्याचे सांगितले. या घटनेला 15 दिवस उलटूनही अद्याप तरुणीचा शोध लागलेला नाही याबाबतची लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सर्वश्री गोपिचंद पडळकर रमेशदादा पाटील यांनीही सहभाग घेतला.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले बोईसर येथील वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यीनीचा शोध घेण्यासाठी गृह विभागाचे सर्व प्रकारे प्रयत्न सुरू आहे.हा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे दयावा अशी मागणी लक्षात घेता तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येईल. राज्यात हरवलेल्या मुली अथवा मुलांसाठी मुस्कान हे ऑपरेशन राबविण्यात येते. आतापर्यंत गृह विभागाने अनेक हरवलेल्या मुला-मुलींना त्यांचे स्वत:चे घर पुन्हा मिळवून दिले आहे. शासन महिलांच्या प्रश्नाबाबत सजग असून महाविद्यालय स्तरावरही महिलांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. राज्यात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही कॅमेरेही वाढविण्यात येत आहेत. सायबर गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी फेसबुक तसेच इन्स्टाग्राम यासारख्या समाजमाध्यमांच्या संदर्भातही सुरक्षिततेच्या दृष्टीने लवकरच उपाययोजना करण्यात येतील. यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या पालकांना द्यावयाच्या मदतीबाबतही आरोग्य मंत्री यांच्याशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी या चर्चेच्या अनुषंगाने उपस्थित उपप्रश्नांना उत्तरे देताना सांगितले.
* शेतकऱ्यांच्या वीज बिलाबाबत शासन शेतकऱ्यांच्या बाजूने -ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
राज्यात कृषीपंपाच्या बिलाबाबत शासन नक्कीच शेतक-यांच्या बाजूने आहे. शेतकऱ्यांच्या वीजबिलाबाबत कृषीधोरण 2020 अंतर्गत शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानपरिषदेत दिली.सदस्य सदाशिव खोत यांनी वीज वितरण कंपनी कृषीपंपाची भरमसाठ बिले आकारत आहे. वीज गळती रोखणे व जेवढा वीजेचा वापर आहे तेवढेच बील वीज ग्राहकांना देण्यात यावीत कोणतीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांची विद्युत जोडणी कापत असल्याबाबतची लक्षवेधी विधानपरिषदेत मांडली. या लक्षवेधीत सर्वश्री प्रविण दरेकर गोपिचंद पडळकर यांनी सहभाग घेतला.
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले महावितरण कंपनीकडे खूप मोठ्या प्रमाणात वीज बिलांची थकबाकी आहे ही थकबाकी कमी व्हावी यासाठी राज्य शासन मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. कृषीपंप वीज धोरण २०२० अंतर्गत राज्यात ६६ हजार नवीन वीज कनेक्शन देण्यात आली आहेत. वीजगळती कमी करून जास्तीत जास्त चांगली सेवा देण्यासाठी वीज वितरण कंपनी देखील सदैव.
* परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी 10 वी तसेच 12वीच्या विद्यार्थ्यांना मुदतीनंतरही विलंब फी आकारणार नाही -शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांना मुदतीनंतर फॉर्म भरल्यास विलंब फी भरावी लागत होती. मात्र सध्याची आव्हानात्मक परिस्थिती पाहता यावर्षी मुदतीनंतर फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब फी आकारण्यात येणार नसल्याची माहिती विधानपरिषदेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.राज्य शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च मध्ये होणाऱ्या दहावी व बारावी परिक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे यामध्ये तांत्रिकदृष्ट्या येत असलेल्या अडचणी पाहता शिक्षण विभागाने विद्यार्थी व पालक यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी लक्षवेधी सूचना विधानपरिषद सदस्य विलास पोतनीस यांनी सभागृहात मांडली. सर्वश्री सदस्य अभिजित वंजारी अनिल तटकरे यांनीही या चर्चेत सहभाग घेतला.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी इ.१०वी व इयत्ता १२वीच्या विद्यार्थ्यांना मुदतीनंतर विलंब फी भरावी लागत होती. मात्र सध्याची आव्हानात्मक परिस्थिती पाहता यावर्षी मुदतीनंतर फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब फी आकारण्यात येणार नाही. कुठलेही विलंब शुल्क न भरता इ. १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या लेखी परीक्षा सुरु होण्याच्या अगोदरच्या दिवसापर्यंत परीक्षेसाठीचे ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याची मुभा देण्यात आली आहे. तांत्रिक बाबींमुळे कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल. काही गावांमध्ये इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे परीक्षेचा अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. आतापर्यंत इ.१२ वीचे १४,३१,६६७ आणि इ.१० वीचे १५,५६,८६१ आवेदन पत्रे प्राप्त झाले आहेत. शाळेच्या संपर्कात नसलेल्या विद्यार्थ्यांना संपर्क करून परीक्षा फॉर्म भरून घेण्याबाबत सर्व शाळा, कॉलेजना कळवण्यात येईल यासंदर्भात जाहीर प्रसिद्धी वर्तमानपत्रांद्वारे देण्यात येईल अशी माहितीही शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
* औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अनियमिततेची चौकशी करणार -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
औरंगाबाद येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये झालेल्या अनियमिततेची पंधरा दिवसात चौकशी करण्यात येईल तसेच दोषींवर कारवाई केली जाईल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते.
सामंत म्हणाले औरंगाबाद येथील विद्यापीठातील अनियमिततेसंदर्भात स्वतः राज्यपाल यांची भेट घेतली असून या विद्यापीठासह इतर विद्यापीठातील अनियमिततेच्या संदर्भातही चर्चा केली आहे. कुलगुरु यांच्या हाताखालील अधिकारी कर्मचारी यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल. मात्र विद्यमान आणि माजी कुलगुरु यांच्या विरोधात चौकशी सुरु करण्यापूर्वी विधी व न्याय विभागाचे मत विचारात घेतले जाईल असेही ते म्हणाले.
राज्यातील अनेक विद्यापीठांनी लेखा परिक्षण अहवाल सादर केले नसल्याचे सांगुन सामंत म्हणाले मुंबई विद्यापीठ, एस एन डी टी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूर या विद्यापीठांनीही गेल्या काही वर्षांपासून लेखा परीक्षण अहवाल सादर केले नसल्याचे त्यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.या विषयावरील झालेल्या कार्यवाहीचा अहवाल पुढील अधिवेशनात सादर करण्याचे निर्देश उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी यावेळी दिले. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री नागोराव गाणार अंबादास दानवे आदिंनी सहभाग घेतला होता.
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८