मि.युनिव्हर्सच्या नावाने खेळाडूंची घोर फसवणूक महिला शरीरसौष्ठवपटूंनी संजय मोरेंविरूद्ध दंड धोपटले
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वच खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावतात. आम्हालाही सांगण्यात आलं की भारतात मि.युनिव्हर्स होतेय. स्पर्धेचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयोजन केले जाणार आहे. जागतिक कीर्तीचे खेळाडू उतरणार आहेत. म्हणून तुम्हीही जोरदार तयारी करा. त्यामुळे आम्ही प्रचंड मेहनत घेतली. दोन महिने अक्षरश: घाम गाळला. स्पर्धेची फी म्हणून 15 हजार रूपयेही संघटनेकडे जमा केले. पण मि.युनिव्हर्ससाठी बालेवाडी गाठली तेव्हा आमची फक्त घोर निराशा झाली. नोंदणी फी म्हणून15 हजार रूपये जमा केले, पण पावती नाही. फाइव्हस्टार हॉटेलमध्ये निवास देणार होते, पण 12 तासांनी एका रूमची किलल दिली तीसुद्धा बालेवाडीतल्या सामान्य रूमची. ज्यात तीन-तीन खेळाडूंना एकत्र कोंबले होते. चार दिवसांच्या भोजनाच्या कूपन दिल्या, पण प्रत्यक्षात जेवण दिलेच नाही. स्वत:च्याच पैशांनी जेवा, म्हणून सलल दिला.सर्वात मोठा अपेक्षाभंग स्पर्धेतील खेळाडूंना पाहिल्यावर झाला. जगभरातील 150 देशातील शेकडो खेळाडू खेळणार होते. प्रत्यक्षात ग्वाटेमाला आणि कझाकस्तानचे हाताच्या बोटावर मोजतील इतकेच परदेशी खेळाडू आले होते आणि भारतातून तब्बल आठशेपेक्षा अधिक खेळाडू आल्याची माहिती संजय मोरे यांनीच दिली.
सर्वात धक्कादायक म्हणजे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतीही निवड चाचणी नसल्यामुळे कुणीही या स्पर्धेत खेळायला उतरले. खुद्द संघटनेनेच जो स्पर्धेत खेळेल त्याला सहभाग प्रमाणपत्र मिळणार असल्याचे जाहीर केल्यामुळे शेकडो हौशी खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. एकप्रकारे संघटनेने 15 हजार रूपयांत आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू होण्याचे प्रमाणपत्रच खेळाडूंना विकून मोठा घोटाळा केला असल्याचा आरोप शरीरसौष्ठवपटू श्रद्धा आनंद यांनी या पत्रकार परिषदेत केली. ही मि. युनिव्हर्स नव्हती हा एक आर्थिक घोटाळा होता. खेळाडूंची घोर फसवणूक होती. संघटनेने नोंदणी फीच्या नावाखाली अनधिकृतपणे कोट्यवधी रूपये गोळा केले. कुणालाही 15 हजार रूपयांची पावती दिली नाही. तसेच ऑनलाईन फी भरणाऱया खेळाडूंची फी वैयक्तिक खात्यावर ट्रान्सफर करायला सांगितली. संघटनेच्या या गैरव्यवहाराची चौकशी व्हायलाच. तसेच पॅम्पलेट प्रमाणे वितरित केलेले निनावी प्रमाणपत्र रद्द करावेत. त्याची कोणत्याही गोष्टीसाठी दखल घेऊ नये, असे आवाहनही या खेळाशी संबंधित सर्व सरकारी क्रीडा संस्थांना केले.संजय मोरेंचा मनमानी कारभार या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळाला. जी खेळाडू महिलांच्या बॉडीबिल्डिंग प्रकारात सहावीसुद्धा येऊ शकत नाही ती प्रिया मजुमदार पहिली आली. हेसुद्धा मोरेंच्या कृपेमुळे. हा निर्णय महिला शरीरसौष्ठव गटातील एकाही खेळाडूला पटला नाही. त्यासाठी सर्व खेळाडूंनी जजेस आणि संघटनेकडे कंपेरिजनची मागणी केली पण त्यांनी आम्हाला दादही दिली नाही. याउलट अपमानास्पद वागणूक दिल्याचे रौप्यपदक विजेत्या हर्षदा पवारने सांगितले.
दिल्लीच्या मेनका भाटियाने आपल्याविरूद्ध दिलेल्या चुकीच्या निर्णयाबाबत बोलण्यासाठी संजय मोरे यांच्याकडे दाद मागितली पण कुणीही तिचे ऐकून घेतले नाही. उलट अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे ती अक्षरश: खचली. आपल्या वरिष्ठांकडे पार केली, पण त्यांनी धीर देण्याऐवजी आपल्यावर आरोप केले. मी चौथी आली पण मला जे प्रमाणपत्र दिले त्यावर माझेच नाव नव्हते. फक्त चौथा क्रमांक लिहून दिलं. मला जे मेडल दिले ते ज्यूनियर गटाचे होते तर राष्ट्रीय स्पर्धा 62 वी होती, पण मेडलवर 60 वे वर्ष लिहिण्यात आले होते. हा सर्व प्रकार लाजीरवाणा होता. नेमकं कळत नाहीय,ही स्पर्धा होती की थट्टा? कुणालाच स्पर्धेबाबत गांभिर्य नव्हते. आमच्या मेहनतीची कुणाला कदर नव्हती. किंमत नव्हती. जर बलात्कार हे महिलांचे शोषण असेल तर हे आम्हा खेळाचे शोषण आहे आणि आता याविरूद्ध आम्हाला आवाज उठवण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आता आम्ही या संघटनेच्या गैरकारभारावर टीका केलीय. आज आम्ही तिघी आहोत. पण उद्या हा आकडा तीस असेल पुढे तीनशे होईल. आता काहीही झालं तरी आम्ही मागे हटणार नाही असा निर्धार दिल्लीच्या मेनका भाटिया हिने व्यक्त केला.
हा कसला डॉक्टर ?
संजय मोरे कधी डॉक्टर झाला हे कळलेच नाही. मी त्याला गेले 25 वर्षे ओळखतोय. त्याने ही डॉक्टरेट कुठून विकत घेतलीय, हा मला प्रश्न पडलाय. डॉक्टर संजय मोरे म्हणून मिरविणाऱया मोरेंनी याबाबत खुलासा करायला हवा. तसेच शरीरसौष्ठवात कोणत्याही संघटनेला आयओएची मान्यता नाहीए. जर ही मान्यता आपल्याकडे असल्याचे सांगत असेल तर ही फसवणूक असल्याचे भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटणीस सुरेश कदम यांनी सांगितले. मि. युनिव्हर्सच्या नावाखाली खेळाडूंवर अन्याय झालाय. आपण महिला खेळाडूंच्या सोबत आहोत आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन सुरेश कदम यांनी दिले.