महाराष्ट्र सोडून गेलेल्या मंत्र्यांचे अंगरक्षक असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार !
मुंबई प्रतिनिधी अरुण पाटील : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून एकनाथ शिंदे यांनी एकाच वेळी तीस आमदार महाराष्ट्राबाहेर नेल्याने आता त्यांच्या या संदर्भातील माहिती गृह विभागाला कशी काय प्राप्त झाली नाही, यासंदर्भात चौकशी करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे मंत्र्यांचे अंगरक्षक असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार लटकत आहे.
मात्र, इतके आमदार बाहेर जातात आणि महाराष्ट्र पोलिसांना साधी खबरही लागत नाही ? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या गृहखात्याने आता मोठा निर्णय घेतला. गुवाहाटीमध्ये पोहोचलेल्या सर्व आमदार, नेते, खासदार यांच्या पोलीस सुरक्षा रक्षकांनी कोणतीही माहिती गृहखात्याला न दिल्याने या सर्व पोलीस सुरक्षा रक्षकांवर कारवाई होणार असल्याची माहिती ही विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. ही कारवाई लवकच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यात दोन बैठका पार पडल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना कारवाईचे आदेश दिल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे. राज्यातील कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांचे सुरक्षारक्षक आता अडचणीत येताना दिसत आहे.
सोमवारी विधान परिषदेसाठी मतदान पार पडले. काही तासात विधान परिषदेच्या सर्व जागांचा निकालही आला. यात महाविकास आघाडीला एका जागेवर दणका बसला. तर भाजपच्या पाच जागा निवडून आल्या. महाविकास या पराभवाची कारणे शोधत असताना आणि इतर नेते यावर प्रतिक्रिया देत असताना. त्याच रात्री एकनाथ शिंदे हे आमदारांचा ताफा घेऊन राज्याच्या बाहेर पडले. यात फक्त आमदारच नाही. तर कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्रीही होते. मग एवढी मोठी घटना घडत असताना सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना कल्पना का दिली नाही? आणि गुप्तचर विभागालाही याची खबर कशी लागली नाही?, असे म्हणत पवारांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती.
भल्या सकाळी एवढे मोठे बंड झाल्याची बातमी समोर आल्यानंतर हे पाहून अनेकांना अजित पवार आणि फडणवीसांचा पाहटेचा शपथविधी आठवला. शिवसेना नेतेही धक्क्यातच होते. मात्र, काही वेळातच मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांसोबत तातडीची बैठक घेतली. तसेच आजही संजय पांडे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली. त्यानंतर आता गृहविभाग हा एॅक्शन मोडमध्ये आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुढच्या काही तासात काही कॅबिनेट मंत्र्यांच्या आणि राज्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८
निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा,मास्क वापरा, लसीकरण करुन घ्या..