पुणे प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- 2022 आज राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर सुरळीत पार पडली. पुण्यातील विमलाबाई गरवारे प्रशाळेतील परीक्षा उपकेंद्राला आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी अचानक भेट दिली. परीक्षार्थ्यांसाठी असलेल्या सुविधांसह केंद्राची त्यांनी पाहणी केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- 2022 द्वारे सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक या संवर्गातील 800 पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरातील 37 केंद्रांवर आज पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षा प्रक्रियेची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी पुणे शहरातील डेक्कन जिमखाना येथील विमलाबाई गरवारे प्रशाळेच्या केंद्रांवर भेट देऊन पाहणी केली.
यापूर्वी देखील लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांच्या वेळी अध्यक्ष निंबाळकर यांनी नागपूर येथील शासकीय विज्ञान संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी, धनवटे नॅशनल कॉलेज, कमला नेहरू महाविद्यालयातील परीक्षा केंद्रांना तसेच पुण्यातील काही परीक्षा केंद्रांना अचानक भेट देऊन पाहणी केली होती.