मुंबई प्रतिनिधी : राज्यातील उच्च न्यायालय व त्यांची सर्व खंडपीठे जिल्हा व तालुका न्यायालये तसेच न्यायाधिकरण येथे उद्या शनिवार दि. 12 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. या लोकअदालतीत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव दिनेश सुराणा यांनी केले आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून ज्युपिटीस (JUPITICE) या कंपनीच्या सहकार्याने ई-लोक अदालतीचे आयोजन केले आहे. लोक अदालतीमध्ये सर्व प्रकारची दिवाणी दावे, धनादेश अनादर प्रकरणे, बँक वसूली प्रकरणे, अपघात प्रकरणे, कामगार वाद प्रकरणे, वीज, पाणी व कर यांच्या देयकाबाबतची प्रकरणे, तसेच वैवाहिक वादाची प्रकरणे, नोकरी बाबतची प्रकरणी ज्यात पगार, इतर भत्ते व निवृत्ती वेतनाचे फायदे समाविष्ट आहेत असे प्रकरण, महसूल बाबतची प्रकरणे तसेच ग्राहक तक्रार निवारण आयोगाची प्रलंबित प्रकरणे तडजोडीसाठी लोकन्यायालयात ठेवण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय लोकअदालतीत वाद मिटविण्यासाठी सहभाग घेतल्याने वादाला पूर्णविराम मिळतो, पैशांची आणि वेळेची बचत होते, निकाल लवकर लागतो तसेच लोकन्यायालयाच्या निवाड्याविरुद्ध अपील नाही. त्यामुळे यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे.