शिधापत्रिका धारकांचे आधार बँक खात्याला जोडण्यात पुणे सोलापूर राज्यात प्रथम-अन्न, नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई प्रतिनिधी  : शिधापत्रिका धारकांचे आधारकार्ड बँक खात्याला जोडण्याचे (आधार सिडींग) कार्यक्षेत्रानुसार 100 टक्के कामकाज पूर्ण करण्यात पुणे विभागातील पुणे व सोलापूर अन्नधान्य वितरण कार्यालयाने राज्यात प्रथम स्थान मिळविले आहे.या यशाबद्दल पुण्याच्या अन्न धान्य वितरण अधिकारी सुरेखा माने व पुणे शहर सर्व परिमंडळ अधिकारी तसेच सोलापूरचे अन्न धान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे तसेच रास्त भाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष यांचा अन्न, नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण आणि सचिव विजय वाघमारे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पुणे विभागाचे उपायुक्त पुरवठा डॉ.  त्रिगुण कुलकर्णी उपस्थित होते.

    पुणे विभागाने ज्या पद्धतीने पुढाकार घेऊन आधारकार्ड बँक खात्याला जोडण्याच्या (आधार सिडींग)  कामकाजामध्ये आघाडी घेतलेली आहे. त्याच धर्तीवर राज्यातील इतर विभागांनी देखील हे कामकाज तातडीने 100 टक्के पूर्ण करावे, असे निर्देश मंत्री चव्हाण यांनी दिले.पुणे विभागातील पुरवठा विभागाच्या कामकाजावर पुरवठा मंत्री चव्हाण यांनी समाधान व्यक्त करून भविष्यात गरजू लोकांना अन्न धान्याचा लाभ मिळावा व सर्वसामान्य जनतेपर्यंत वेळेत धान्याचे वितरण पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. रास्त भाव दुकानदाराना वारंवार येणाऱ्या ई-पॉस (Epos) मशीनच्या अडचणीबाबत लवकरच मार्ग काढण्यात येईल, असेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले. 

    पुणे विभागाचे उपायुक्त पुरवठा डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘पीएम वाणी’ या उपक्रमाची माहिती दिली. तसेच विभागामधील रास्त भाव दुकानदार यांच्या आर्थिक उत्पन्न वाढीसाठी विभागात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. चांगल्या कामाची दखल शासनस्तरावर घेतली जाते व अशा अधिकाऱ्यांचा शासनाच्यावतीने गौरव केल्यास त्यांना अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. लवकरच पुणे विभागातील उर्वरित कार्यालयांचे 100 टक्के आधार सिडींग पूर्ण केले जातील, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८