शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्प होणार-उद्योगमंत्री उदय सामंत
मुंबई प्रतिनिधी : बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या भूसंपादनाचे काम स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करत असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले. रत्नागिरी येथील बारसू या गावात सुरु होत असलेल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पासंदर्भात आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यासंदर्भातील माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत बोलत होते.या तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार राजन साळवी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी होणारे भूसंपादन, पाणी पुरवठा आदी मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सामंत पुढे म्हणाले “या प्रकल्पासाठी शिवणे देवाचे गोटणे या गावांचे भूसंपादन होणार नाही. तर सोलगाव हे गाव कायमचे वगळण्यात येईल आणि या भागात आदर्शवत असे कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येईल”.“या भागातील 70 ते 80 टक्के शेतकरी आणि स्थानिकांनी या प्रकल्पाला पाठिंबा दाखविला आहे. या प्रकल्पाबाबत असलेले जनतेचे गैरसमज दूर केले जातील. याशिवाय जमिनीच्या दराबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली जाईल, तसेच एकूण पॅकेजची माहिती शेतकऱ्यांना, स्थानिकांना देण्यात येईल” असे सामंत यांनी स्पष्ट केले.बारसू येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी एकूण 6200 एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यापैकी 2900 एकर जमीन संपादित करण्यात आली असून या प्रकल्पामुळे दोन लाख कोटींची थेट गुंतवणूक होणार आहे. यातून सुमारे एक लाख रोजगार निर्माण होणार आहेत.
रिफायनरी बैठकीतील महत्वपूर्ण निर्णय :
• पाण्याची व्यवस्था : प्रकल्पासाठी कोयना धरणातून पाणी आणण्यास आज तत्वतः मान्यता देण्यात आली. या मार्गावरील गावांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येईल. या पाण्याचा वापर जिल्ह्यातील इतर भागालाही होईल. १६० एमएलटी पाणी कंपनीला लागणार आहे.
• राजापूर शहर अर्जुना व खोदवली नदी पात्रातील गाळ काढणे आवश्यक आहे. राजापूर नगरपरिषद, नाम फाऊंडेशन आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गाळ उपसा करण्यात येणार असून माध्यमातून किमान ५ लाख क्युबिक मीटर गाळ काढला जाईल.
• प्रकल्पासोबत या भागात एक अद्ययावत असे सुपर स्पेशालिटी रुग्णालय निर्माण करण्यात येईल. ओणी येथे उपलब्ध असणारे रुग्णालय तत्काळ सुरू करण्यात येईल. इथे लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
• मुंबई गोवा महामार्ग रस्त्यालगत सुमारे एक लाख वृक्ष लावण्यात येणार आहेत. आंबे, काजू यांची झाडे लावण्यास प्राधान्य देण्यात येईल.
• समाज माध्यमे, मुद्रित माध्यमे, दृकश्राव्य माध्यमे यांच्या साह्याने व्यापक जनजागृती करून नागरिकांचे प्रकल्पाविषयी असलेले गैरसमज दूर करण्यात येतील.
• या प्रकल्पासाठी शिवणे, देवाचे गोटणे या गावांचे भूसंपादन होणार नाही. तर सोलगाव हे गाव कायमचे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.याच भागात आदर्शवत असे कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येईल.