महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी डॉ. चहांदे उपमुख्यमंत्र्यांनी दिली पद व गोपनीयतेची शपथ
नागपूर विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी डॉ. संजय अंबादास चहांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय निवासस्थान देवगीरी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चहांदे यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.या शपथविधीस उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, अतिरिक्त मुख्य सचिव (जलसंपदा) दीपक कपूर, नितीन करीर, राजेश कुमार, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सदस्या श्वेताली ठाकरे, डॉ. साधना महाशब्दे, प्राधिकरणचे सचिव डॉ. रामनाथ सोनवणे, सचिव रंजनकुमार शहा, राजेंद्र मोहिते, उपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव डॉ. संतोष पाटील, गोसीखुर्दचे मुख्य अभियंता आशिष देवगडे, अधिक्षक अभियंता राजेश सोनटक्के, पद्माकर पाटील, राजीवकुमार पराते, कन्नाजीराव वेमुलकोंडा उपस्थित होते.
जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ. चहांदे यांना शपथ दिली. तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.डॉ. संजय चहांदे हे सेवानिवृत्त सनदी अधिकारी असून 1988 च्या बॅचचे आयएएस आहेत. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात पदवी प्राप्त केली आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून एम.एस्सी केले आहे. अमेरिकेतून त्यांनी लोकप्रशासन ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. आपल्या 34 वर्षाच्या प्रशासकीय सेवेत त्यांनी अनेक पदे भुषविली आहेत. नांदेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेस प्रारंभ, मुंबई शहर व उपनगर येथे जिल्हाधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक, नाशिकचे विभागीय आयुक्त, यशदा पुणे येथे महासंचालक, महिला व बालविकास विभागाचे सचिव, मुख्यमंत्री कार्यालयात सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव, पाणी पुरवठा विभागाचे तसेच सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. तसेच केंद्रीय सेवेत असतांना आधारकार्ड प्रकल्पाचे उपमहासंचालक म्हणूनही त्यांनी कामकाज केले आहे.