सायन्स काँग्रेसमध्ये प्रतिबिंबीत व्हावी महाराष्ट्राची विज्ञान तंत्रज्ञानातील भरारी-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर विशेष प्रतिनिधी : इंडियन सायन्स काँग्रेसचे आयोजन नागपूर येथे दि. 3 ते 7 जानेवारी दरम्यान होत आहे. या आयोजनात महाराष्ट्राची विज्ञान व तंत्रज्ञानातील भरारी प्रतिबिंबीत व्हावी. शाळा, महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी- विद्यार्थीनी यात सहभागी होतील अशी उपाययोजना करावी,अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिल्या.

    उपमुख्यमंत्र्यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी 108 व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या आयोजनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला उच्च तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी प्रसन्ना बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाचे कुलगुरु एस.आर. चौधरी, नागपूर मेट्रोचे संचालक अनिल कोकाटे, विद्यापीठाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

    कुलगुरु एस.आर. चौधरी यांनी सादरीकरणातून पूर्वतयारीची माहिती दिली. दि.3 ते 7 जानेवारी दरम्यान विद्यापीठ परिसरात केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे आयोजित या परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करणार आहेत. देशातील 7 हजार शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत. कृषी, वने, प्राणी, मत्स्य, पशुशास्त्र, अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, सांख्यिकी, वैद्यकीय विज्ञान, नवीन जीवशास्त्र अशा विविध 14 शाखांमधील नवनवीन शोध प्रबंध, प्रदर्शन, मार्गदर्शन होणार आहे. या मार्गदर्शनाचा लाभ विज्ञानस्नेही  विद्यार्थ्यांना होईल.

    उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी यंत्रणा उभारा. राज्यातील अन्य ठिकाणावरूनही सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करा. बाहेरुन येणाऱ्या प्रतिनिधींच्या निवास, प्रवासाची उत्तम व्यवस्था ठेवा. विदेशातून येणाऱ्या शास्रज्ञांच्या निवास व्यवस्थेबाबत विशेष काळजी घ्या, अशी सुचना त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की,   यंदा विद्यापीठाला शंभर वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे विद्यापीठाचा हा प्रमुख कार्यक्रम समजून उत्तम प्रसिद्धी करा. या आयोजनाचे यजमान पद महाराष्ट्राकडे आहे. महाराष्ट्राने विज्ञान, तंत्रज्ञान व सर्व क्षेत्रातील प्रगतीची भरारी प्रतिबिंबीत व्हावी याकडे विशेष लक्ष द्यावे, असे फडणवीस यांनी सांगितले.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८