१८ कोटीच्या कर चोरी प्रकरणी एका व्यक्तीला अटक

मुंबई प्रतिनिधी  : बनावट देयक देणाऱ्या करदात्यांसंदर्भात महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाकडून विशेष मोहिम  राबविण्यात येत आहे.  मेसर्स हीर ट्रेडर्सच्या मालकाने बनावट कागदपत्रे वापरून फसव्या पद्धतीने नोंदणी करुन १० कोटींची बनावट वजावट (इनपुट टॅक्स क्रेडिट) मिळवली तसेच रू. ८ कोटीची बनावट विक्री देयके दिली असल्याचे आढळून आले. या १८ कोटींच्या करचोरी प्रकरणी संबंधित व्यापाऱ्यास अटक करण्यात आली असल्याची माहिती, अन्वेषण विभागाचे राज्यकर सह-आयुक्त यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

    या प्रकरणात मे. हीर ट्रेडर्सचे व्यापारी विजय अनिल मोतीरमानी याने कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला विशेष मोहिमेअंतर्गत अटक केली आहे. तसेच त्याला या प्रकरणात १२ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.खोटी देयके देऊन तसेच कोणत्याही वस्तू व सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता, खोटे व्यवहार, विवरणपत्रात नमूद करून करचोरी करणाऱ्या तसेच पुढील खरेदीदार व्यापाऱ्यांना खोटी कर वजावट (इनपुट टॅक्स क्रेडिट) हस्तांतरित करणाऱ्या व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवणे व अशा व्यवहारास प्रतिबंध घालण्याच्या सदर मोहिमे अंतर्गत सन २०२२- २३ मधील आतापर्यंतची ही ५९ वी अटक आहे.

    सदर प्रकरणात सहाय्यक राज्यकर आयुक्त मुंबई अन्वेषण ड ०४४, प्रशांत खराडे यांनी ही धडक कारवाई केली व या प्रकरणी अटकेची कारवाई करण्यासाठी त्यांना सहाय्यक राज्यकर आयुक्त श्रीकांत पवार विद्याधर जगताप सुमेधकुमार गायकवाड आणि राज्यकर निरिक्षक व कर सहायक यांनी मदत केली. सदर मोहिम राज्यकर सह-आयुक्त अन्वेषण-क विभाग मुंबई अनिल भंडारी (भा.प्र.से.) व राज्यकर उपायुक्त, अन्वेषण- क विभाग मुंबई मोहन प्र. चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८