उष्णतेच्या लाटांमध्ये शून्य मृत्यू हे उद्दीष्ट

उष्णतेच्या लाटा आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन विषयक राष्ट्रीय कार्यशाळेचे १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी आयआयटी पवई येथे आयोजन

मुंबई प्रतिनिधी : उष्णतेच्या लाटा आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन करणे’ या विषयावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी मुंबई), नागपूर येथील विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ आणि १४ फेब्रुवारी २०२३ रोजी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यामध्ये देशातील विविध राज्यातील व  महाराष्ट्रातील विविध मान्यवर तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.

    या कार्यशाळेचे उद्घाटन दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १०.३० या वेळेत मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणचे सहसचिव कुणाल सत्यार्थी, आयआयटीचे संचालक डॉ. सुभाशीस चौधरी, आपत्ती व्यवस्थापनचे संचालक अप्पासाहेब धुळाज यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.५०  ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ‘वातावरण बदल आणि उपाययोजना’ याविषयी दिवसभर वेगवेगळ्या विषयांवर मान्यवरांचे चर्चासत्र होणार आहेत. दि. १४ तारखेला ‘उष्णतेच्या लाटा टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना’, राष्ट्रीय, राज्य, जिल्हे आणि गावपातळीवर राबवावयाच्या उपाययोजना या विषयावर सकाळी ९.३० पासून दुपारी २.३० पर्यंत चर्चासत्र होणार आहेत.

उष्माघातामुळे आरोग्यावर होणारे परिणाम टाळणे

    जगभरात वातावरणात अनेक बदल होत आहेत. अचानक येणारी वादळे, पाऊस आणि उन्हाळ्यात उष्णतेची लाट वाढत आहेत. वातावरण बदल आणि मानाकनांनुसार पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने केलेल्या सूचनेनुसार अलिकडच्या काळात उष्णतेच्या लाटांची तीव्रता आणि वारंवारता वाढली आहे. सन 2004 ते 2019 दरम्यान पंधरापैकी अकरा सर्वात उष्ण वर्षे आली होती. गेल्या काही वर्षांपासून भारतात उष्णतेच्या लाटा वाढत आहेत ज्यामुळे लोकांच्या आरोग्यावर खूप मोठे परिणाम होत आहेत. आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणे तसेच उष्माघातामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता आहे. या विषयाच्या अनुषंगाने या दोन दिवसीय चर्चासत्रात मार्गदर्शन केले जाणार आहे.

उष्णतेच्या लाटांमध्ये शून्य मृत्यू हे उद्दीष्ट

    उष्णतेच्या लाटांमध्ये शून्य मृत्यू हे उद्दीष्ट गाठण्यासाठी राज्य शासन, विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्था आणि या क्षेत्रात काम करणारे अभ्यासक यांनी एकत्र येवून उष्णतेच्या लाटांबाबत उपाययोजना, तत्काळ नियोजन, प्रभावी कृती आराखडा बनविणे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) ने भारतातील अति उष्णतेच्या लाटेशी संबंधित कार्यक्रम अंमलबजावणी, समन्वय आणि मूल्यमापनासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुषंगाने या कार्यशाळेत चर्चा व मार्गदर्शन केले जाणार आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८