महिलांना मिळणार १ रुपयात सॅनिटरी पॅड्स

जन औषधी सुगम ॲपच्या माध्यमातून मिळेल औषधांची माहिती..

विशेष प्रतिनिधी : प्रधान मंत्री भारतीय जन औषधी योजना (PMBJP) औषधे रसायन आणि खते मंत्रालय भारत सरकार यांच्या निर्देशानुसार सर्वांना परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार जेनेरिक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि जेनेरिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे देशभर उघडण्यात आली आहेत.आतापर्यंत देशभरात ९१७७ हून अधिक जन औषधी केंद्रे उघडली गेली आहेत, जी देशातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ७४३ जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. यावर्षी दिनांक डिसेंबर २०२३ पर्यंत या केंद्रांची संख्या १०,००० पर्यंत वाढविण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. जनऔषधी जेनेरिक औषधांच्या किमती खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या ब्रँडेड औषधांच्या किमतीपेक्षा ५० ते ९० टक्के कमी आहेत. त्यामुळे ही योजना दररोज औषधे घेत असलेल्या लोकांसाठी खूप फायद्याची ठरत आहे. चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये आतापर्यंत प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांद्वारे ११०० कोटी रुपयांची विक्री झाली आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांसाठी सुमारे ६६०० कोटी रुपयांची बचत झाली आहे. मागील आठ वर्षांत जनऔषधी केंद्रांची संख्या जवळपास १०० पटीने वाढली आहे आणि त्याचप्रमाणे जनऔषधी औषधांच्या विक्रीतही १०० पटींनी वाढ झाली आहे आणि अंदाजे २०,००० कोटी रुपयांची बचत झाली आहे. (त्यानुसार मागील ८ वर्षात सुमारे २०००० कोटी रुपयांची बचत झाल्याचा अंदाज आहे.)

    महिलांच्या आरोग्य सुरक्षेची दखल घेऊन, भारत सरकारने जन औषधी सुविधा सॅनिटरी पॅड सर्व जन औषधी केंद्रांमध्ये माफक दरात उपलब्ध करून दिले आहेत.जन औषधी केंद्रांवर जन औषधी सुविधा सॅनिटरी पॅड्स रु.१/- प्रति पॅड या दरामध्ये उपलब्ध आहेत. जन औषधी केंद्र चालकांना शासनाकडून रु. ५.०० लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. महिला उद्योजक, दिव्यांग व्यक्ती, निवृत्त सैनिक, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या अर्जदारांना तसेच ईशान्येकडील राज्यांच्या डोंगराळ भागातील अर्जदारांना रु.२.०० लाखांची आर्थिक मदत दिली जाते.

    “जन औषधी सुगम" नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन आता Google Play Store आणि Apple Store वर उपलब्ध आहे. त्याशिवाय या मोबाईल अप्लिकेशनच्या माध्यमातून आता तुम्हाला आवश्यक असलेल्या औषधांची माहिती कधीही - कुठेही मिळू शकणार आहे. औषधाची किंमत उपलब्धता आणि तुमच्या जवळच्या जन औषधी केंद्राची माहिती इत्यादीबाबत या ॲपद्वारे माहिती मिळेल. 

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८