मुबई प्रतिनिधी : बेल्जियमचे मुंबईतील वाणिज्यदूत फ्रॅंक गिरकीन्स यांनी सोमवारी (दि. ५) राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट घेतली.मुंबई आणि बेल्जियम मधील अँटवर्प दोन्ही हिऱ्यांच्या व्यापाराची शहरे आहेत आणि दोन्ही ठिकाणी व्यापारी बंदरे आहेत.बेल्जियममध्ये फ्लेमिश प्रांत ब्रसेल्स व वलून हे तीन स्वायत्त प्रांत असून तेथे सशक्त प्रादेशिक सरकारे आहेत असे गिरकीन्स यांनी सांगितले. भारतातील दूतावासात या तिन्ही प्रांतांचे व्यापार प्रतिनिधी बसतात व आपापल्या प्रांतात गुंतवणुकीसाठी प्रयत्न करतात असे त्यांनी सांगितले.
भारतातील लोकांना बेल्जियमबाबत अधिक माहिती व्हावी व बेल्जियमच्या लोकांना भारताबद्दल माहिती व्हावी या दृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच बेल्जियमकडे युरोपीय संघाचे अध्यक्षपद येत असून या काळात आपण भारताशी मैत्रीपूर्ण संबंध अधिक वृद्धिंगत करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.'पिकू' चित्रपटाचे सुरुवातीचे बरेचशे चित्रीकरण बेल्जियममध्ये झाले असल्याचे सांगून आपण भारतीय चित्रपट उद्योगाला देखील आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर चालना देणार असल्याचे गिरकीन्स यांनी सांगितले.
बेल्जियमच्या गेंट, लूवन व ब्रसल्स मुक्त विद्यापीठांचे भारतातील काही विद्यापीठांशी शैक्षणिक सहकार्य करार झाले असल्याबद्दल आनंद व्यक्त करून बेल्जियमने महाराष्ट्रातील विद्यापीठांसोबत देखील सहकार्य प्रस्थापित करावे असे राज्यपालांनी वाणिज्यदूतांना सांगितले.बेल्जियमच्या १६० कंपन्या भारतात काम करीत आहेत ही समाधानाची बाब असल्याचे सांगून उभयपक्षी प्रयत्न केल्यास दोन्ही देशांचा व्यापार सध्याच्या १५.१ बिलियन युरोवरून मोठ्या प्रमाणात वाढू शकतो असे राज्यपालांनी सांगितले.
पहिल्या महायुद्धात फ्लॅण्डर्स येथे वीर मरण प्राप्त झालेल्या भारतातील ९००० शहीद जवानांचे वायप्रेस येथे स्मारक बनविल्याबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले.