महिलांना रोजगाराच्या संधीसह स्वच्छ सुरक्षित इंधन पुरविण्यासाठी उमेद पुढाकार घेणार

उमेद आणि हिंदुस्थान पेट्रोलियम महामंडळ मर्यादित यांच्यात सामंजस्य करार–रुचेश जयवंशी

वी मुंबई प्रतिनिधी : ग्रामीण कुटुंबांतील बचत गटाच्या महिलांना रोजगाराच्या संधीसह स्वच्छ आणि सुरक्षित इंधन पुरवठा व्हावा तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद) च्या समूदाय संसाधन व्यक्तींना अधिकचे उत्पन्न व्हावे या हेतूने उमेद आणि हिंदुस्थान पेट्रोलियम महामंडळ मर्यादित (HPCL) यांच्यातील सामंजस्य करार मैलाचा दगड ठरणार आहे, असे प्रतिपादन उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी रुचेश जयवंशी यांनी केले.

  ग्रामीण भागातील कुटुंबांपर्यंत एलपीजी गॅसचा पुरवठा करण्याच्या दृष्टिने रोजगाराच्या संधी, उपजीविका स्त्रोत निर्माण करणे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमधील ग्रामीण भागातील कुटुंबांना एलपीजी गॅस बाबत विविध सेवा पुरविणे त्यांना स्वयंपाकाकरिता स्वच्छ आणि सुरक्षित इंधन पुरविणे बंद पडलेल्या गॅस जोडणीचे पुनरुज्जीवन करणे, नवीन जोडणी देणे, स्वच्छ आणि सुरक्षित इंधनाचे महत्व व गरज तळा-गाळापर्यंत पोहोचविणे इ. बाबींचा समावेश यात आहे. या उद्देशाने आज हिंदुस्थान पेट्रोलियम महामंडळ मर्यादित (HPCL) व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान-उमेद (MSRLM) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी एचपीसीएल चे कार्यकारी संचालक अबुजकुमार जैन व्ही. एस चक्रवर्ती मुख्य महाव्यवस्थापक पश्चिम विभाग उमेद अभियानाच्या उपसंचालक शीतल कदम यांच्यासह दोन्ही कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 उमेद’ अभियानातील कार्यरत समूदाय संसाधन व्यक्ती (CRP) ची एचपी सखी म्हणून निवड करण्यात येणार आहे. पुरविण्यात येणाऱ्या सेवांसाठी एचपी सखी यांना ठराविक दराने सेवाशुल्क देण्यात येईल. या सामंजस्य करारामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांना निरंतर स्वच्छ आणि सुरक्षित इंधनाचा पुरवठा होण्यास व व त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील महिलांना उत्पन्नाचे अतिरिक्त साधन निर्माण होऊन त्यांच्या उपजीविकेत वाढ होणार असल्याबाबत जयवंशी यांनी समाधान व्यक्त केले. उमेद्च्या समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून कार्यरत असणाऱ्या महिला उत्कृष्ट कार्य करतील अशी खात्रीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

  सुरुवातीस प्रायोगिक तत्वावर राज्यात जळगाव कोल्हापूर नागपूर  नाशिक व अहमदनगर या जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येणार आहे. या ५ जिल्ह्यातील प्रत्येकी ३ तालुक्यांची या पथदर्शी प्रकल्पासाठी निवड करण्यात आलेली आहे. या प्रकल्पाचा आढावा घेऊन पुढे याची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८