बाप्पाच्या स्वागताला पाऊसधारा या जिल्ह्यांत मुसळधार बरसणार...

मुंबई प्रतिनिधी  चित्रलेखा रासने : राज्यात आज घरोघरी मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात लाडक्या गणरायाचं आगमन होत आहे. बाप्पाच्या आगमनाच्या दिवशीच गुडन्यूज मिळाली आहे. पावसाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या बळीराजाला समाधान होईल असा पाऊस बरसणार आहे. तसेही गणपती उत्सवाच्या दहा दिवसात पाऊस होतोच. आताही हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भ मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात ढग जमा होत आहेत. परिणामी राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील चार ते पाच दिवसात राज्यात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा आता उत्तर पूर्व बंगाल खाडीकडे सरकला आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यात पावसासाठी  वातावरण निर्मिती झाली आहे. हवामान विभागाने याआधीही पावसाची शक्यता व्यक्त केली होती. मात्र तसा पाऊस झाला नाही. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहिली तर पाण्याची नितांत आवश्यकता आहे. सुरुवातीच्या काळात पाऊस पडला नाही त्यामुळे खरीप हंगामातील अनेक पिके वाया गेली आहेत. त्याचा परिणाम आता उत्पादनावर होऊन उत्पादन कमी होईल. तसेच पाण्याअभावी राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

हवामान विभागाने आज राज्यातील 5 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला  आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना वर्धा, नागपूर, नंदूरबार जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यात गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे शहर मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणातील काही भागांत आज पाऊस होईल अशी शक्यता आहे. गणरायाच्या स्वागतलाच पाऊसधारा बरसतील असा अंदाज आहे.सध्याच्या परिस्थितीत राज्यात काही ठिकाणी पाऊस होत आहे. मात्र सगळ्याच ठिकाणी नाही. तसेच ऑगस्ट महिना कोरडाच गेला आहे. तसेच या महिन्याच्या सुरुवातीलाही चांगला पाऊस झालेला नाही. त्यामुळे आता पावसाची जास्त गरज आहे. सुदैवाने राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे या दिवसांत चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे सर्वांकडून चांगल्या पावसाची वाट पाहिली जात आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८