कृषी पुरस्कार जाहीर राज्यातील शेतीनिष्ठ शेतकरी व संस्थांचा होणार सन्मान-धनंजय मुंडे

मुंबई प्रतिनिधी : सन २०२०-२०२१ व २०२२ करिता कृषी विभागामार्फत देण्यात येणारे शेतकरी व शेतीशी संबंधित संस्था यांचा सन्मान करणाऱ्या शासकीय पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली आहे.अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.त्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

  राज्य शासनाच्या कृषी व कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी व तत्सम संस्थांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार जिजामाता कृषिभूषण पुरस्कार कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार युवा शेतकरी पुरस्कार उद्यान पंडित पुरस्कार वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी व सर्वसाधारण गट) पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषिरत्न पुरस्कार (मंत्रालय स्तर) असे विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

  सन २०२० पासून कोरोनाच्या संकटाच्या काळात या पुरस्कारांच्या वितरणात खंड पडला होता.दरम्यान धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून या तीनही वर्षातील कृषी विभागाच्या पुरस्कारांचे वितरण करण्याबाबत ते आग्रही होते.त्यानुसार सन २०२० २०२१ व २०२२ मधील पुरस्कारांची विभागनिहाय घोषणा करण्यात आली आहे.

  कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांच्या सोबतीने प्रोत्साहनपर रक्कम दिली जाते त्या रकमेतही मंत्री मुंडे यांनी नुकतीच तब्बल चारपटीने वाढ केली आहे.दरम्यान लवकरच या पुरस्कारांचे शासन स्तरावर कार्यक्रम आयोजित करून वितरण करण्यात येणार असल्याचेही मंत्री मुंडे यांनी सांगितले.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८