आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकल व शालेय साहित्याचे वितरण..
नागपूर प्रतिनिधी : महिला सक्षमीकरणात शिक्षण हा अत्यंत मोलाचा घटक असून यासाठी मुलींना प्रोत्साहित करणाऱ्या अनेक योजना राज्य शासनातर्फे राबविण्यात येत आहेत.या पार्श्वभूमीवर आरबीएलच्या उम्मीद उपक्रमाअंतर्गत गरजू विद्यार्थिनींना सायकल व शालेय साहित्याचे वितरण हा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.आरबीएल बँकेतर्फे उम्मीद या समाजसेवी (सीएसआर) उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थिनींना सायकल व शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.तसेच धन्वंतरी आरोग्य शिबिराचे उदघाटनही यावेळी करण्यात आले.
आमदार संदीप जोशी प्रवीण दटके आरबीएलचे कोषाध्यक्ष अशोक चांडक व संचालक मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.मनीष नगर परिसरात आयोजित कार्यक्रमात आज उपस्थितांच्या हस्ते १०० सायकलींचे वाटप करण्यात आले.मुख्यमंत्री म्हणाले मुलींच्या शिक्षणातीतील एक मोठा अडथळा म्हणजे त्यासाठी करावा लागणारा लांब पल्ल्याचा प्रवास हा आहे. आरबीएलतर्फे वितरीत करण्यात येणाऱ्या सायकलींमुळे विद्यार्थिनींना शाळेत जाणे सुलभ होण्यासह उपस्थितीत सातत्य राखण्यासाठी मदत होत आहे.विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी याची अधिक मदत होत आहे.
समाजातील गरजू व वंचित विद्यार्थिनींच्या शैक्षणिक समस्यांची जाणीव ठेवून आरबीएल आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत आहे. हे अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले आरबीएलतर्फे दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात.धन्वंतरी आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून डोळे तपासणी चष्मे वाटप तसेच इतर तपासण्या नि:शुल्क करण्यात येत आहेत. मुलींचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी याचा निश्चितच उपयोग होईल.
नुकतेच गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील कवंडे या गावी विद्यार्थिनींना सायकलवाटप करण्यात आले.त्यावेळी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंद बघून समाधान लाभल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे अत्याधुनिक सुविधा व साधनांपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थिनींचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल.आरबीएलने भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करावे अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. आरबीएलचे कोषाध्यक्ष अंशुल चांडक यांनी प्रास्ताविक करताना यावर्षी १८०० सायकलींचे वितरण करण्यात येणार असून मागील वर्षी ४८०० सायकली विद्यार्थिनींना देण्यात आल्याचे सांगितले.समाजसेवी (सीएसआर) उपक्रमाअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.