सोलापूर प्रतिनिधी : येथील विडी घरकुल भागातील रहिवासी अंबादास बिच्छल यांचा मुलगा ०८ वर्षीय मयुरेश याच्या हृदयास असलेल्या छिद्राच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची मोलाची मदत झाली. राजधानी मुंबईतील एका नामवंत रूग्णालयात बुधवारी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या तत्परतेमुळे मयुरेशला नवजीवन मिळाल्याने अंबादास बिछल यांनी सर्वांचं आभार मानलं आहे.
सोलापुरातील विडी घरकुल परिसरात अंबादास बिच्छल चहाची विक्री करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ भागवत आले आहेत.अंबादास यांच्या दोन अपत्यापैकी ०८ वर्षीय मयुरेश शिंदे प्रशालेचा विद्यार्थी आहे.त्याच्या छातीत त्रास जाणवू लागल्यावर झालेल्या वैद्यकीय चाचण्यात त्याच्या हृदयास छिद्र असल्याचे निदान झाले होते.डॉक्टरांनी त्यासाठी औषधोपचाराचा खर्च म्हणून जवळपास दोन लाख रुपयांचा खर्च होण्याचा अंदाज वर्तवला होता.चहा विकून उपजिवीका भागवित असलेल्या अंबादास च्या कुटुंबाची परिस्थिती हालाखीची त्यातच मुलाच्या ह्रदय शस्त्रक्रियेसाठी डाॅक्टरांनी औषधोपचारासाठी सांगितलेला खर्च हा त्यांच्यासाठी मोठा होता. अंबादास बिच्छल यांनी मुलाच्या हृदयास छिद्र असल्याची समस्या रूग्णसेवक आनंद गोसकी यांना कळविली.
आनंद गोसकी यांनी मुंबईतील एका मोठ्या हाॅस्पीटलमध्ये उपचारासाठी संबधित हाॅस्पीटल प्रशासनास कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने धर्मादाय व आरोग्य योजनेच्या माध्यमातून दोन लाख रूपयांचे उपचार मोफत करण्यासाठी हाॅस्पीटलचे अंकित श्रीमाळी यांना विनंती केली.त्यांनी तात्काळ होकार देत पुर्णपणे उपचार मोफत करण्यात येईल असे सांगून रूग्णांला दोन दिवसात हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख रामेश्वर नाईक सोलापूरचे आनंद गोसकी यांच्यामुळे आमच्या मुलाचे जीव वाचल्याचे वडील अंबादास यांच्याकडून सांगण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहाय्यता कक्षाचा संवेदनशीलपणा या ठिकाणी मला अनुभवास आला.हाॅस्पीटलकडून खूप उत्तमरित्या मुलाचे ऑपरेशन झाल्याबद्दल त्यांनी हाॅस्पीटलचंही आभार व्यक्त केले.