विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असाच निर्णय घेणार

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असाच निर्णय घेणार


- उदय सामंत



अंतिम सत्राच्या परीक्षांसंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्स


मुंबई प्रतिनिधी : राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असा विद्यार्थांच्या हिताचाच निर्णय घेतला जाईल. असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. सामंत म्हणाले, अंतिम सत्राच्या परीक्षेसंदर्भात काय निर्णय घ्यावा, याबद्दल राज्यपाल यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून राज्य समितीने दोन दिवसांमध्ये परीक्षेसंदर्भात प्रारूप आराखडा तयार करून तो अहवाल राज्यपाल आणि शासनास सादर करावा, अशा सूचना व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून  कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीमध्ये  देण्यात आल्या.


           अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना ग्रेड देऊन पुढे पाठवायचे की कसे, यावरही चर्चा करण्यात आली. हा निर्णय घेत असताना एकाही विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांना पुढे अडचणी येऊ नयेत असाच निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि मानसिक स्थितीचा पूर्णपणे विचार करून वस्तुस्थितीचा अंदाज घेऊन शिक्षणाची गुणवत्ता कायम ठेवत विद्यार्थी हिताचाच निर्णय घेतला जाईल. असेही श्री. सामंत यांनी संगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या स्थितीमध्ये राज्यातील असंख्य महाविद्यालये, विद्यापीठाच्या इमारती, वसतिगृह हे  क्वारंटाइनसाठी दिलेली आहेत. त्यामुळे या इमारती वापरासाठी कधी खुल्या होतील, हे आताच सांगणे कठीण आहे. अशा स्थितीमध्ये परीक्षा घेणे कितपत शक्य होईल, यावर यावेळी चर्चा झाली.


           व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विभागाचे सचिव सौरभ विजय, तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य संचालक डॉ. अभय वाघ तसेच सर्व विद्यापीठांचे कुलगुरू सहभागी झाले होते.


      दिगंबर वाघ


              कार्यकारी संपादक- ९४०४४५३५८८


 


                   घरी राहा, सुरक्षित राहा 
                   प्रशासनाला सहकार्य करा...