मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई प्रतिनिधी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात ,' स्वातंत्र्य संग्रामाला 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे', असा हूंकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दिला. आपल्या विद्वत्तेने आणि प्रखर पत्रकारितेने लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिश राजवटीला हादरे दिले. त्यासाठी अनेकदा तुरुंगवास भोगला. त्यांच्या त्याग,समर्पण आणि लढवय्ये पणामुळे आपण आज समृद्ध, बलशाली राष्ट्राचे स्वप्न पाहू शकतो. लोकमान्य टिळक यांच्या विचारांना आणि स्मृतींना विनम्र अभिवादन!
लोकमान्य टिळकांच्या जयंतिनिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे मंत्रालयात अभिवादन
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांनी मिळवून दिलेल्या 'स्वराज्या'चे आपण सर्वांनी मिळून 'सुराज्या'त रुपांतर करुया असे, आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशु सिन्हा उपस्थित होत्या.
लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त विधानमंडळात अभिवादन
लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधानभवनातील टिळकांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन येथे आदरांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार, विधानसभा सदस्य हिरामन खोसकर, नितीन पवार, विधीमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत, उपसचिव विलास आठवले, सभापतीचे सचिव महेंद्र काज, अवर सचिव रविंद्र जगदाळे, आदींसह विधानमंडळाचे अधिकारी यांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.