वैनगंगा नदीवरील पुलाच्या टोलवसुलीची फेर लेखा तपासणी करावी

वैनगंगा नदीवरील पुलाच्या टोलवसुलीची फेर लेखा तपासणी करावी


     - अशोक चव्हाणमुंबई प्रतिनिधी : भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या मोठ्या पुलाच्या  टोलवसुलीसंदर्भात विभागाने फेर लेखा तपासणी करावी,  असे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील  दालनात टोलवसुली, भंडारा येथे नादुरूस्त महामार्गामुळे होत असलेली गैरसोय यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि  भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांची  बैठक झाली.


    नागपूर-भंडारा हा मार्ग सन २०१५ मध्ये पूर्ण झाला,  मात्र सध्या देखभाल आणि दुरूस्तीअभावी या  रस्त्याची दुर्दशा झाली आहे.  रस्ता खराब असूनही टोल वसुली मात्र सुरूच आहे.  याबाबत विधानसभा अध्यक्ष, नाना पटोले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.   ऑक्टोबर अखेरपर्यंत या रस्त्याची दुरूस्ती पूर्ण करुन रस्ता वाहतुकीस सुयोग्य व्हावा,  अन्यथा संबंधित कंत्राटदारांवर कडक कारवाई केली जाईल अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या.  त्याचप्रमाणे लातूर शहरालगत जाणारा राष्ट्रीय महामार्ग नगरपालिकेच्या मागणीनुसार ६ कि.मी.च्या उड्डाणपुलासह बांधण्यात यावा,  जेणेकरून शहरातील वाहतूक कोंडी टळेल आणि शहरवासीयांच्या सुविधेला प्राधान्य मिळेल, या मुद्दयाकडे वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांनी लक्ष वेधले. पुलबांधणीचा कार्यारंभ आदेश १६ नोव्हेंबर,१९९८ रोजीचा असून ३२.५७ कोटी निविदा किंमत होती. सन २००१ पासून पथकर वसुली सुरू होऊन आजपर्यंत ३५८ कोटी रुपयाची वसुली करण्यात आली आहे. मुदतवाढीचे प्रकरण आणि विभागाने त्याला दिलेले आव्हान यासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. बांधा-वापरा आणि हस्तांतरीत करा तत्वावरील पथकर हक्कासहचे हे प्रकरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तर्फे अनुदानित आहे, तर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे त्याची अंमलबजावणी सुरू आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली.


     वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अ.अ. सगणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता विनय देशपांडे, उपसचिव राजेंद्र शहाणे, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नवी दिल्लीचे  महाव्यवस्थापक तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.


   दिगंबर वाघ             


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..