85 हजार 428 बेरोजगारांना मिळाला रोजगार

कोरोना संकटकाळात बेरोजगारांना मोठा दिलासा 85 हजार 428 बेरोजगारांना मिळाला रोजगार


  -कौशल्य विकास मंत्री  नवाब मलिक



मुंबई प्रतिनिधी  : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. पण असे असतानाही कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या आधारे एकुण 85 हजार 428 इतक्या बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती विभागाचे मंत्री  नवाब मलिक यांनी दिली. फक्त सप्टेंबर महिन्यात 32 हजार 969 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान एकूण 1 लाख 17 हजार 843 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती मंत्री  मलिक यांनी दिली.


      मंत्री मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते.


मुंबईत सप्टेंबरमध्ये मिळाला 20 हजार जणांना रोजगार


      माहे सप्टेंबरमध्ये या वेबपोर्टलवर 63 हजार 593 इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात 27 हजार 252, नाशिक विभागात 6 हजार 644, पुणे विभागात 11 हजार 681, औरंगाबाद विभागात 9 हजार 161, अमरावती विभागात 5 हजार 009 तर नागपूर विभागात 3 हजार 846 बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली. माहे सप्टेंबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे 32 हजार 969 उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक 20 हजार 805, नाशिक विभागात 2 हजार 244, पुणे विभागात 4 हजार 187, औरंगाबाद विभागात 3 हजार 128, अमरावती विभागात 1 हजार 293 तर नागपूर विभागात 1 हजार 312 इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.


सप्टेंबरमध्ये 16 हजार जागांसाठी ऑनलाईन मुलाखती


     कौशल्य विकास विभागाने लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांची मोठी मोहीम सुरु केली आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात 111 ऑनलाईन रोजगार मेळावे झाले. सप्टेंबरमध्ये झालेल्या 35 मेळाव्यांमध्ये 236 उद्योजकांनी सहभाग घेतला. त्यांच्याकडील 16 हजार 683 जागांसाठी त्यांनी व्हॉटस्अॅप, स्काईप, झूम अॅप आदींच्या सहायाने ऑनलाईन मुलाखती घेतल्या. या मेळाव्यांमध्ये 9 हजार 856 नोकरीइच्छूक तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी आतापर्यंत 3 हजार 936 तरुणांना रोजगार मिळाला आहे. उर्वरित जागांसाठी उर्वरित तरुणांमधून निवड प्रक्रिया सुरु आहे. सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असे मंत्री  मलिक यांनी सांगितले.


नोकरीइच्छूक तरुणांनी नोंदणी करण्याचे आवाहन


     मंत्री  मलिक म्हणाले की, यापुढील काळातही रोजगार उपलब्धतेसाठी विभागामार्फत मोहीम पातळीवर काम केले जाईल. नोकरीइच्छूक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि आधार क्रमांकासह नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.


दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..