धनगर समाज शिष्टमंडळाशी विविध मुद्यांवर चर्चा

धनगर समाजाच्या आरक्षण व आर्थिक विकासाच्या


मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलणार


      - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



मुंबई प्रतिनिधी : धनगर समाजाच्या आर्थिक विकासाच्या व अन्य मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलली जातील. आरक्षणासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यासाठी कायदेतज्ज्ञ आणि विविध घटकांशी समन्वय साधला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धनगर समाज शिष्टमंडळाला दिला. धनगर समाजाच्या आरक्षण व विविध मागण्यांबाबत शिष्टमंडळाने   मुख्यमंत्री ठाकरे यांची शुक्रवारी ( दि.९) सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. शिष्टमंडळासमवेत झालेल्या बैठकीस मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार अनिल देसाई यांच्यासह मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा आदी उपस्थित होते.


     मुख्यमंत्री  ठाकरे म्हणाले की, धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी खूप जूनी आहे. त्यामुळे या विषयाची कोंडी फोडण्यासाठी करता येतील, ते सर्व प्रयत्न केले जातील. आरक्षणाच्या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी कायदेतज्ज्ञ आणि विविध घटकांशी विचारविनिमय करून सल्ला घेतला जाईल. तसेच या विषयाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा व्हावा यासाठी समन्वयही साधला जाईल. समाजाच्या विकासासाठीच्या योजनांच्या आर्थिक तरतुदीबाबत निश्चितच सकारात्मक असे प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. मदत व पुनर्वसन मंत्री  वडेट्टीवार यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत विविध स्तरांवर पाठपुरावा केला जाईल असे सांगितले.


     बैठकीत शिष्टमंडळातील माजी आमदार प्रकाश शेंडगे, माजी मंत्री आण्णा डांगे, रमेश शेंडगे, खासदार विकास महात्मे, रामराव वडकुते, माजी आमदार अनिल गोटे, गणेश हाके, सुभाष खेमनार,  उज्ज्वलाताई हाके आदींनी आरक्षण आणि विविध मागण्यांच्या अनुषंगाने मांडणी केली.


दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..