बार्टी संस्थेसाठी निधी उपलब्ध जुने उपक्रमही सुरूच

बार्टी संस्थेसाठी निधी उपलब्ध जुने उपक्रमही सुरूच


- प्रधान सचिव श्याम तागडेमुंबई प्रतिनिधी : सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान मार्फत विविध प्रकल्प राबविले जातात. त्या प्रकल्पातील कामानुसार या संस्थांमध्ये बाह्यस्त्रोताद्वारे मनुष्यबळ घेण्यात येते. त्यामुळे ‘बार्टी’ व समता प्रतिष्ठानमधील पदे कमी करण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच कोवीड परिस्थितीमुळे या दोन्ही संस्थांद्वारे राबविण्यात येणारे काही कार्यक्रम व उपक्रम शासनाने घालून दिलेल्या निर्बंधामुळे सध्या स्थगित असले तरीही बार्टी संस्थेस शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला असल्याने पुढील कार्यवाही सुरु आहे, असे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी स्पष्ट केले आहे.


      सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या बार्टी व समता प्रतिष्ठानमधील कर्मचारी कपात, निधीची उपलब्धता व प्रकल्पासंदर्भात माध्यमांमध्ये उपस्थित होत असलेल्या प्रश्नासंदर्भात सामाजिक न्याय विभागाने स्पष्टीकरण केले आहे. बार्टी व समता प्रतिष्ठानध्ये विविध प्रकल्प राबविण्यात येतात. या प्रकल्पासाठी संबंधित विषयातील जाणकारांची सेवा बाह्यस्त्रोताद्वारे कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात घेण्यात येते. तसेच विशिष्ट प्रकल्प पूर्ण झाला की, या नियुक्त्या रद्द केल्या जातात. सध्या नवीन कार्यक्रमांची आखणी करण्याचे काम सुरू आहे. तसेच जुने उपक्रम सुरूच आहेत. त्यामुळे बार्टी व समता प्रतिष्ठानमधील पदे कमी करण्याचा अथवा निधी दिला नसल्याचे वक्तव्य हे दिशाभूल करणारे असल्याचे विभागाने म्हटले आहे.


 दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..