हाफकिन महामंडळाने केलेले काम प्रशंसनीय

कोविड -19 काळात हाफकिन महामंडळाने केलेले काम प्रशंसनीय


वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे गौरवोद्गार



मुंबई प्रतिनिधी : कोविड-19 काळात हाफकिन महामंडळ आणि हाफकिन संस्थेने केलेले काम प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी काढले. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी परळ येथील हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्था आणि हाफकिन जीव - औषध निर्माण महामंडळाच्या संस्थेला भेट दिली. यावेळी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय हाफकिन संस्थेच्या प्रभारी संचालिका सीमा व्यास, हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाचे महाव्यवस्थापक (उत्पादन) सुभाष शंकरवार, हाफकिन खरेदी कक्षाचे महाव्यवस्थापक डॉ. कुंभार, हाफकिन संस्थेचे सहाय्यक संचालक डॉ. शशिकांत वैद्य, आदी मान्यवर उपस्थित होते.


     वैद्यकीय शिक्षण मंत्री  देशमुख म्हणाले की, हाफकिन संस्था मागील सहा महिन्यांपासून आलेल्या आपत्तीमध्ये अविरत काम करत आहे. या कामामध्ये अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांनी केलेले काम प्रशंसनीय आहे. हाफकिन संस्थेच्या माध्यमातून अहोरात्र कोविड -19 टेस्टिंग लॅब सुरु आहे. तर हाफकिन महामंडळाने  राज्य शासनाच्या वतीने विविध दात्यांकडून वैद्यकीय साहित्य आणि साधने स्विकारून त्याचे राज्यातील सर्व शासकीय दवाखाने आणि वैद्यकीय महाविद्यालये यांना यशस्वीरित्या वितरण केले याबाबतही देशमुख यांनी प्रशंसाही केली.


    आजच्या भेटीमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी राज्य शासनाचा अंगीकृत उपक्रम असलेल्या हाफकिन जीव- औषध निर्माण महामंडळाच्या कार्याविषयी, विविध जीव रक्षक औषधांच्या उत्पादन निर्मितीविषयी माहिती जाणून घेतली.  तसेच येथे कार्यरत असणाऱ्या 'हाफकिन खरेदी कक्ष', हाफकिन महामंडळाच्या अद्ययावत प्रणालीने कार्यरत असलेल्या आणि जीवरक्षक व जेनेरिक औषधे यांची उत्पादन निर्मिती करणाऱ्या फार्मा प्रकल्पाला भेट दिली. याचदरम्यान  देशमुख यांनी हाफकिन संस्थेच्या ऐतिहासिक संग्रहालयाला भेट दिली.


 दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..