जलविद्युत केंद्राची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या

आधुनिकीकरणासाठी सर्वतोपरी मदत करणार

   - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


रत्नागिरी प्रतिनिधी
 : आधुनिक महाराष्ट्राच्या  विजेच्या स्वयंपूर्णतेसाठी  कोयना विद्युत प्रकल्पाचे योगदान महत्त्वाचे आहे.  आगामी काळात या  प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या  बाबींसाठी शासन  सर्वतोपरी  मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोयना विद्युत प्रकल्प  टप्पा चार विद्युतगृहाच्या पाहणी दरम्यान दिली.  यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री नितीन राऊत,  परिवहन व संसदीय कार्य मंत्री अनिल परब, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री (गृह) शंभूराज देसाई, सर्वश्री आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम,  वीज निर्मिती कंपनीचे कार्यकारी संचालक संजय खंडारे, कोंकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ,पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय मोहिते, रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा, रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

      कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी कोयना नदीवर धरण बांधून पाणी अडविले आहे. या प्रकल्पाचे चार टप्पे आहेत. जास्त मागणीच्यावेळी सर्व मिळुन या टप्प्यातून 1920 MW वीज निर्मिती केली जाऊ शकते. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (म.रा.वि.मं./MSEB) या कंपनीच्या विद्यमाने चालविला जातो.  हेळवाक जवळील देशमुखवाडी येथे या प्रकल्पाचा चौथा टप्पा तयार करण्यात आला आहे. सह्याद्री डोंगराच्या पोटात ३०० मीटर खोलीवर हा टप्पा आहे. या टप्प्यातून लेक टॅपिंग पध्द्तीने १००० MW (मेगावॉट) वीज निर्मिती केली जाते. जलविद्युत केंद्राच्या  पाहणीच्यावेळी प्रकल्पाविषयीचे सादरीकरण करण्यात आले. पाहणीवेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक तांत्रिक बाबी अभियंत्यांकडून माहिती करून घेतल्या. जलविद्युत प्रकल्पाच्या पाहणीपूर्वी उपस्थित सर्वांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.


दिगंबर वाघ  

कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 🙏 सावधानी बाळगा कोरोना पासून बचाव करा 🙏